देवळे जंगलवाडी येथील टॉवरच्या बॅटऱ्या चोरणारे दोघे २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

साखरपा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; साखरपा पोलिसांचे सर्वत्र होतेय कौतुक

साखरपा– संगमेश्वर तालुक्यातील देवळे जंगलवाडी येथील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या दोन चोरट्यांच्या साखरपा पोलीसांनी २४ तासात मुसक्या आवळल्या आहेत. साखरपा पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिऱ्या-नागपूर महामार्गावरील देवळे जंगलवाडी फाट्यानजीक असणाऱ्या एका मोबाईल टॉवरमधील बॅटऱ्या चोरण्यासाठी चोर आले असताना सिक्युरिटी अलार्म वाजल्याने चोरट्याची पंचायत झाली. त्या ठिकाणी असणारा सुरक्षारक्षक जागा झाला. त्यामुळे चोरटे त्या ठिकाणहून त्यांनी सोबत आणलेली टाटा ऐस गाडी टाकून पसार झाले. त्या सुरक्षारक्षकाने 112 या पोलीस हेल्पलाईन क्रमांकाला कॉल केला. त्यावेळी प्रत्यक्ष ड्युटीवर असणारे पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन जाधव व चालक कॉन्स्टेबल तानाजी पाटील यांनी देवरुख पोलीस निरीक्षक अतुल जाधव, उपनिरीक्षक नामदेव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळ गाठले.

त्यांनी त्या ठिकाणी असलेली टाटा ऐस गाडी आणि चोरी करण्यासाठी वापरलेले सामान जप्त करण्यात आले. घटना स्थळावरून आरोपी फरार झाल्याने त्यांना शोधणे अवघड काम होते. त्यानंतर साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे नितीन जाधव, संजय कारंडे, नितीन भोंडवे, तानाजी पाटील, वैभव नटे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सूत्र हलवत चोरट्यांना जेरबंद केले. हे चोरटे लांजा येथील असून त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे. या आधी जिल्ह्यात अनेक ठिकाणी बॅटरी चोरी झाल्याचे गुन्हे विविध पोलीस स्थानकात दाखल आहेत, त्यामुळे अन्य चोऱ्या देखील उघडकीस होण्यास मदत होणार आहे.दरम्यान, धडक कारवाई करत साखरपा पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.