रस्त्यालगत निष्काळजीपणे वाहने उभी केली जात असल्याचा परिणाम
खेड(प्रतिनिधी) खेड शहरात वाहने उभी करण्यासाठी पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनला आहे. कॅफे कॉर्नर ते बसस्थानक मार्ग सातत्याने वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकत आहे. तर भरणे नाक्यावर देखील वाहतुकीची कोंडी होत असुन महामार्गावरील अवघड वळणामूळे अपघात होत आहेत. याच बरोबर रस्त्यालगत निष्काळजीपणे उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हॉटेल कॅफे कॉर्नर ते बसस्थानक मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. याच मार्गावर पोलीस ठाणे, तहसील कार्यालय, भूमी अभिलेख, सेतू कार्यालय असल्याने दैनंदिन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक असते. मात्र पूरक प्रमाणात पार्किंग व्यवस्था नसल्याने काहीजण रस्त्यालगतच वाहने उभी करतात. यामुळे होणारी वाहतूक कोंडी साऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दस्तूरखुद्द पोलीस ठाण्या समोरच होणाऱ्या वाहतूक कोंडीने वाहनचालक व नागरिक हैराण झाले आहेत. हॉटेल कॅफे कॉर्नर नजिक निमुळत्या मार्गावर वाहने वळवताना वाहतूक कोंडी होत आहे. यावर अद्यापही नगरप्रशासनाने ठोस उपाययोजना केलेली नाही. येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचे खापर पोलीस यंत्रणेवर फोडण्यापलिकडे काहीच केले जात नसल्याने प्रश्न गंभीर बनत आहे.
हॉटेल कॅफे कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील दुकानांसमोर खरेदीकरिता जाण्यासाठी वाहने रस्त्यालगतच उभी केली जातात. यापूर्वी पोलिसांनी वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याची मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम थंडावल्याने वाहनचालकांचे फावत आहे. यामुळे हा मार्ग वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकत आहे. पोलीस यंत्रणेने ही बाब गांभीर्याने घेवून निष्काळजीपणे वाहने उभी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
चौकट :
भरणे नाक्यावरील महामार्गालगत असलेल्या अवघड वळणावर मोठ्ठी वाहने वळवताना अनेक अपघात घडत आहेत. हे अवघड वळण काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय विचारे यांनी केली आहे.












