वेत्ये तिवरे येथील समुद्रकिनारी सापडली ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाची अंडी

कासवमित्र गोकुळ जाधव यांनी केली संरक्षित

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील वेत्ये तिवरे येथील समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवाची सुमारे ३७५ अंडी सापडली आहेत. वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली येथील कासवमित्र गोकुळ जाधव यांनी सदरची अंडी हॅचरीमध्ये सुरक्षित ठेवली आहेत.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सागरी जिल्ह्यांमधील काही किनाऱ्यावर दरवर्षी समुद्री कासवांमधील ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. वनविभागाच्या नोंदीनुसार रायगड जिल्ह्यातील ४ तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी १४ किनाऱ्यांवर कासवांची विण होते. राजापूर तालुक्यातील वाडातिवरे, वेत्ये आणि आंबोळगडचा किनारा सागरी कासवांच्या विणीसाठी प्रसिध्द आहे. नोव्हेंबर ते मे हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. मात्र यावर्षी काहीसा उशिराने कासव अंडी देण्यासाठी समुद्रकिनारी दाखल झाल्याचे पहायला मिळत आहे.

गतवर्षी ऑक्टोबर महिन्यातच वेत्ये तिवरे किनारी पहिल्यांदाच कासवाची अंडी सापडली होती. तर यंदाच्या कासव विणीच्या हंगामातील पहिले घरटे वेत्ये या ठिकाणी दि.२५ डिसेंबर २०२४ रोजी सापडले होते. त्यामध्ये कासव मादीने १३० अंडी घातलेली आहेत. तर सोमवार दि. ६ जानेवारी रोजी १२० अंडी व मंगळवार दि. ७ जानेवारी रोजी १२५ अंडी सापडली आहेत. वेत्ये येथील कासवमित्र गोकुळ जाधव यांना ही अंडी सापडली असून त्यांनी राजापूर वनपाल जयराम बावदाने, वनरक्षक विक्रम पुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची अंडी हॅचरीमध्ये संरक्षित केली आहेत.

दरम्यान समुद्राच्या भरतीमुळे व भटकी कुत्री, कोल्हे इत्यादी प्राण्यांमुळे कासवांनी वाळूमध्ये केलेल्या घरट्यांना धोका उद्भवतो. त्यामुळे अंडी देऊन मादी कासव परतल्यानंतर कासव मित्रांकडून ही अंडी टोपलीतून सुरक्षितरीत्या हॅचरीत ठेवली जातात. भरती रेषेपासून दूर कासवांच्या घरट्यांचे संरक्षण करणेसाठी हॅचरी तयार केली जाते. या हॅचरीत मादी कासवाने केलेल्या खड्ड्याप्रमाणे कृत्रिम खड्डा तयार केला जाते. त्यामध्ये ही अंडी ठेवून त्यावर वाळू टाकून खड्डा भरला जातो. सदर घरट्यातील अंड्यांमधून सुमारे ४० ते ६० दिवसामध्ये कासवांची पिल्ले बाहेर येतात. त्यानंतर या पिल्लांना कासवमित्राकडून सुरक्षितरित्या समुद्रकिनारी सोडले जाते.