मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी
संतोष कोत्रे l लांजा -: लांजा शहरात गेल्या काही दिवसांपासून गांजा सारख्या अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. विशेष करून यामध्ये सध्या काही महाविद्यालयीन तरुण देखील गांजाचे सेवन करीत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. अशाप्रकारे वैयक्तिक स्वार्थापोटी तरुण पिढी बर्बाद करणार्या व लांजा शहरात गांजाचे नेटवर्क आणि त्याचा पुरवठा करणारा मास्टरमाइंड कोण आहे? याचा शोध घेऊन थेट त्याच्यावरच कारवाई केल्यास या गांजा प्रकरणाचा बिमोड करणे शक्य होणार आहे. लांजा पोलिसांनी त्या दृष्टीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे .
मुंबई गोवा महामार्ग वसलेल्या आणि सुसंस्कृत शहर अशी ओळख असलेल्या लांजा शहरात गांजा सारख्या अमली पदार्थाचा विळखा तरुण पिढीभोवती पडला आहे. लांजा शहरात सुरू असलेल्या अमली पदार्थाची विक्री आणि सेवन यामुळे भावी पिढी या अमली पदार्थाच्या आहारी जात असून त्यामुळे पालक त्रस्त झाले आहेत. आणि अमली पदार्थाच्या सेवनामुळे गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढीस लागले आहे. यापुर्वीही शहरातील अमली पदार्थाच्या विक्री आणि सेवना विरोधात लांजातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत अशा प्रकारच्या अमली पदार्थ विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी लांजा पोलीस निरीक्षक, लांजा तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. पोलिसांनी देखील कारवाईचा बडगा उगारला होता.
मात्र सध्या ही कारवाई थंडावल्याने पुन्हा एकदा या गांजा विक्री व सेवन प्रकरणाने डोके वर काढले आहे. बर्याचदा नागरिकांची मागणी आणि पोलिसांना वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आल्यानंतर होणारी कारवाई ही काही काळापुरती मर्यादित राहते.
पोलिसांच्या या कारवाईत केवळ छोटे मासे गळाला लागतात. मात्र झाडाच्या फांद्या छाटण्यापेक्षा झाडाच्या मुळाशी जाऊन ते शोधून काढल्यास याचे उच्चाटन करणे सोपे होईल असे नागरिकांचे म्हणणे आहे.
लांजा शहरात गांजा पुरवठा करणारा नेमका सूत्रधार कोण आहे? त्याचे कोणाशी लागेबांधे आहेत
याची माहिती घेऊन त्याच्यावरच थेट कारवाई करणे आवश्यक आहे. यामध्ये पोलिसांवर राजकीय दबाव देखील येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अशा प्रकारचे अवैद्य धंदे करणाऱ्याला बऱ्याचदा राजकीय वरदहस्त असल्याचे अनेक घटनांमधून दिसून आलेले आहे. अशावेळी लांजा पोलिसांना जर ही गांजा विक्रीची पाळेमुळे समुळ नष्ट करायची असतील तर येणारी राजकीय बंधने झुगारून कारवाई करणे अपेक्षित आहे. तर आणि तरच गांजाचे समुळ उच्चाटन करणे शक्य होणार आहे.
लांजा पोलिस या दृष्टीने कशाप्रकारे कारवाई करणार हे आगामी काळात दिसून येणार आहे.
चौकट -: लांजा शहरापासून ४/५ किमी अंतरावर असलेल्या व एका बाजूला असलेल्या बंगल्यात रात्रीच्या वेळी परजिल्ह्यातून हा गांजा आणला जातो. त्यानंतर ‘त्या’ मास्टरमाईंड कडून आपल्या नेटवर्क द्वारे तो सर्वत्र वितरीत केला जातो अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. पोलिसांनी यादृष्टीने तपास करणे गरजेचे आहे.
______________________________________











