कोकण मोहरतय…!

साधारणत: नोव्हेंबर अखेरपासून कोकणात थंडीची चाहूल लागते. डिसेंबर, जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा किंवा पंधरवडा हा थंडीचा हंगाम असतो. कोकणातील कडाक्याची पडणारी थंडी ज्यांनी अनुभवलेली असेल ते काश्मिरच्या, नागपूरच्या थंडीलाही न घाबरता सामोरे जातील.

थंडीच्याकाळात फार छान आल्हाददायक वातावरण असत. कडाक्याची पडलेली थंडी आणि चुलींवरची ‘फुटी’ चहा (दूध न वापरता बनवलेला) एकदम भारी, आजकाल अमेरीकन संशोधनानंतर डॉक्टर चहात दूध न टाकता चहा घ्या म्हणून सांगतात. त्यामुळे पूर्वीच्या या ‘फुटी’ चहाला आज ब्लॅक टी च्या नावाने जगभरात बारसं करून पंचतारांकित हॉटेल संस्कृतीतही त्याला मानाचा पान प्राप्त झालं आहे. अशा चहाचा आस्वाद घेत कोकणातील सामान्य माणूस जगातील सामाजिक, राजकीय घडामोडींवर कमालीच भाष्य केल्याशिवाय त्याला जमणारही नाही. चालू हंगामात आंबा, काजू, कोकम, जांभूळ, सुपारी या पिकांच काय होईल कशी स्थिती असेल यासंबंधीही कोकणातील शेतकरी गजालींमध्ये रमताना दिसेल. आणि भरपूर थंडी पडली तर तोच सामान्य शेतकरी, आंबा, काजू बागायतदार या जोरदार पडणाऱ्या थंडीने आंबा, काजूचा मोहर पाहून कमालीचा आनंदी झालेला दिसतो. यावर्षी पावसाळाही बाराही महिने आहे की काय ? असं वाटण्याजोगी स्थिती होती. अधून-मधून केव्हाही पाऊस पडत होता. यामुळे कोकणात फक्त पाऊसच पडणार की काय ? कोकणात थंडीच पडणार नाही असा चिंतातूर झालेला शेतकरी, बागायतदार होता. परंतु मागील पंधरवड्यात थंडी आली आणि आंबा, काजूच्या बागांमध्ये मोहोर दिसू लागला. आंबा, काजू बागायतीतील मोहोर पाहून निश्चितच बागायतदार शेतकरी सुखावला. याचे कारण वर्षभराची आर्थिक बेगमी होईल याचा आजच्या घडीला विश्वास बागायतदार शेतकऱ्यांना या आंबा, काजू मोहरामध्ये दिसू लागला आहे. आंबा, काजू, कोकम अशी कोकणात तयार होणारी फळ मागील काहीवर्षात अनियमित होत आहेत. बागायतदार शेतकरी आर्थिक तोटा सहन करून आहे. मात्र, कोकणातील शेतकरी आंबा, काजू, कोकमचे नुकसान झाले तरीही शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याची वाट न पहाता किंवा आपल्याच बागायतीत बुलडोझर न फिरवता कष्टाची नव्याने मशागत करत प्रयत्न करीत रहातो. यावर्षी नाहीतर पुढच्यावर्षी तरी चांगल फळपिक येईल या अपेक्षेने असतो. आणि कोकणवासिय ज्या श्रद्धेने, भक्तीभावाने आपल्या लाडक्या गणरायाची वाट पहातो त्याच अपेक्षेने यावर्षी फळपिक चांगल येईल अशी अपेक्षा ठेऊन कोकणवासिय आहे. कोकणातील हापूस आंब्यावर ज्यापद्धतीने कर्नाटक आदी राज्यातील आंब्याच संकट आलेलं आहे. कोकणातीलही बाजारातून कर्नाटकचा आंबा विक्रीला बाजारात दिसतो. यामुळे कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांवर केवढे मोठं संकट उभं आहे ते सहज लक्षात येऊ शकेल. याबाबतही कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी फारच जागृकतेने विचार करण्याची आवश्यकता आहे. एकिकडे निसर्गाच बदलत्या हवामानाच संकट आहे. त्याचबरोबर फळ बाजारातही डुपलीकेट आंबा, काजू विक्रीला आणून त्यातूनही कोकणातील आंबा, काजूला बदनाम करण्याच काम फारमोठ्या प्रमाणात होत आहे. बागायतदार शेतकऱ्यांनी यासाठी एकसंघ असलं पाहिजे. संघटनात्मकतेने याविरोधात उभं रहाण्याची गरज आहे. परंतु कोकणातील बागायतदार शेतकरीही पक्षिय राजकारणामध्ये अधिक स्वारस्य घेऊन आहे. आंबा, काजू, कोकम, सुपारी आदी फळपिकांच उत्पादन घेणारा शेतकरी जर संघटीतपणे यासर्वांचा विचार करू लागला तर ते अधिक याग्य होईल. बागायतदार शेतकऱ्यांमध्येही सतत संवाद असणे आवश्यक आहे. फळपिकांवरची चर्चा होत रहायला हवी. त्यात कोकण कृषि विद्यापिठाचे कृषी तज्ञांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा, समस्यांवर उपाय कसे करायचे यासाठीचा सकारात्मक संवाद होत राहिला तर विक्री व्यवस्थेच्या बाजारातही कोकणचा दबाव आणि दबदबा तयार होईल. आज आंबा बागायतदार विखुरलेला आहे. तो संघटीत होणार नाही याची खात्री एपीएमसी मार्केटमध्ये बसलेल्या आंबा दलालाना आहे. त्यामुळेच कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांना वाट्टेल त्या पद्धतीने आंब्याला दर दिला जातो. हातरूमालाखाली आजही आंब्याचा दर ठरतो हे दुर्दैवच म्हणावं लागेल. महाराष्ट्रातील ऊस, कापूस, द्राक्ष, डाळींब, संत्री, मोसंबी अशा असंख्य फळपिक घेणारा शेतकरी संघटीत आहे म्हणूनच वर्षानुवर्षे ऊस पिकवणारा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी शासकीय अनुदानाचे आणि नुकसान भरपाईचे टॉनिक दिलं जातं. वर्षानुवर्षे शासकीय अनुदानावर पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पिकवणारा शेतकरी आणि साखर कारखाने उभे आहेत. यातला कुठलाच फारसा वाटा कोकणातील शेतकऱ्याला मळला नाही आणि यातही कोकणातील शेतकऱ्याला काय मिळत असेल तर कोकणातील शेतकरी तहसिलकडे अर्ज करून शेजारच्या शेतकऱ्याच नुकसान कस झालं नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तिथेही आपणच आपल्याच शेतकऱ्याला आडव जातो उर्वरित महाराष्ट्रात सर्वांनीच मिळून खाऊया चा मोठा उद्योग होतो. कोकणातील शेतकरी, बागायतदार सरकारी अनुदानाच्या मेहरबानीवर नसतो हे अनेकवेळा कोकणाने दाखवुन दिले आहे. कोकणातील आंबा, काजू बागायतीत झाडांवरचा मोहर पाहून कोकणवासिय सुखावला आहे. आता सर्वकाही निसर्गाच्याच हातात आहे.