ई ग्रामस्वराज पोर्टलवर दिसत नसल्याने १५ वित्त आयोग निधी खर्च करण्यास अडसर 

त्वरित कार्यवाही न झाल्यास प्रजासत्ताक दिनी ग्रामस्थांसह उपोषण 

भोम सरपंच अनुराधा वराडकर यांचा इशारा 

सावंतवाडी । प्रतिनिधी : भोमवाडी ग्रामपंचायत आजगाव ग्रामपंचायतमधून १९७६ साली विभाजन होवून स्वतंत्र ग्रामपंचायत झाली आहे. भोमवाडी ग्रामपंचायत 190764 हा स्वतंत्र LGD कोड आहे. सदरचा कोड INACTIVE झाल्याने भोमवाडी ग्रामपंचायत EGRAMSWARAJ या पोर्टलवर दिसत नसल्याने ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोग बिले खर्च करता येत नाही. त्यामुळे जनतेस न्याय देणारे गावविकास कार्य करू शकत नसल्याने याबाबत त्वरित योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा भोम सरपंच अनुराधा वराडकर यांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केले आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, भोम गाव हा पुर्वी शासनाकडुन महसुल गाव नसताना ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आलेली आहे. सध्या सदर ग्रामपंचायत महसूल गाव आजगावच्या हद्दीत वसलेली आहे. मात्र सद्यस्थितीत भोमवाडी ग्रामपंचायत EGRAMSWARAJ या पोर्टलवर दिसत नसल्यामुळे १५ वा वित्त आयोगाची बिले खर्ची घालता येत नाहीत. त्यामुळे गावच्या विकासात मोठा अडसर निर्माण झाला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वेळोवेळी भेट देऊन लक्ष वेधले असले तरीही अद्याप पर्यंत काहीच कार्यवाही अद्याप झालेली नाही. गावचा प्रथम नागरीक सरपंच म्हणुन मला गावविकासाची १५ वा वित्त आयोग अंतर्गत कामे करता येत नाही. त्यामुळे याबाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे आपले ग्रामपंचायतीतील सहकारी व ग्रामस्थांसह उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.