धरण उशाला अन कोरड घशाला, वेरवली गावची व्यथा

धरण बांधून ४० वर्षे पूर्ण झाली मात्र गावात पाण्याचा थेंब नाही

संतोष कोत्रे | लांजा :- करोडो रुपये खर्चून आणि जवळपास ४० वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी वेरवली बेर्डेवाडी येथील धरण प्रकल्पातून वेरवली गावाला आजतागायत पाण्याचा एकही थेंब मिळालेला नाही. धरणाचे काम सुरू होऊन एक पिढी संपली मात्र पाण्याचा पत्ता नसल्याने धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच काहीशी परिस्थिती सध्या वेरवली ग्रामस्थांची आहे .

 

लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक बेर्डेवाडी हे लघुपाटबंधारे प्रकल्पांतर्गत ६०८.५० मीटर लांबीचे तर ५५.३६ मीटर उंचीचे धरण बांधण्यात आले आहे. या धरणामध्ये २१.६८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा साठवण्यात येणार आहे. यासह धरणातून मुख्य कालवा काढण्यात आला असून त्याची १४ मीटर लांबी आहे. या धरणाच्या माध्यमातून वेरवली ब्रूद्रुक परिसरातील १०८१ हेक्टर क्षेत्र जमिन सिंचनाखाली
आणण्याचे उद्दिष्ट आहे .सन १९८३ ला भूमिपूजन होऊन वेरवली बेर्डेवाडी या ठिकाणी धरणाच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर या धरणाच्या कामाला सुरुवात होऊन काम पूर्ण झाल्यानंतर गेल्या ४० वर्षांच्या कालावधीत आजतगायत पाण्याचा एक थेंबही वेरवली गावाला मिळालेला नाही. उलट धरण जवळ असताना देखील दरवर्षी वेरवली गावातील डोळसवाडी, गुरववाडी, भालेकरवाडी, सुतारवाडी बौद्धवाडी येथील ग्रामस्थ व सरदेसाई कुटुंब यांना दरवर्षी तीन महिने म्हणजे अगदी मार्च पासून ते जून पर्यंत पाणी विकत आणून घेण्याची वेळ येते ,इतकी भयानक अवस्था या ठिकाणी होते. म्हणजेच धरण जवळ असताना देखील या गावावर पाणीटंचाईची वेळ येते. यातील सरदेसाई यांचे घर धरणापासून अवघ्या १ किमी अंतरावर आहे. मात्र त्यांनाही पाण्याची प्रतिक्षा करावी लागते आहे.

 

वेरवली बेर्डेवाडी धरण प्रकल्पासाठी आजवर १०० कोटीहुन अधिक रक्कम खर्ची पडली असल्याचे येथील ग्रामस्थ आणि धरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे साक्षीदार असलेले श्रीकृष्ण सरदेसाई यांनी सांगितले. वेरवली गावातील लोकांना, ग्रामस्थांना पाण्याचा उपयोग व्हावा, लोकांना पाणी मिळावे यासाठी या काढलेले कालवे तसेच टाकलेल्या नवीन पाईपलाईन ही सर्व कामेही चुकीच्या पद्धतीने झालेली असल्याने वेरवली ग्रामस्थांना धरणातील पाण्याची प्रतीक्षाच करावी लागत असल्याचे ग्रामस्थ श्रीकृष्ण सांगितले.

 

दरवर्षी कॅनॉल किंवा पाईपलाईनसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च पडलेला असताना ग्रामस्थांना पाणी मिळणे सोडाच परंतु शासनाला देखील यातून एक रुपयांचे उत्पन्न मिळालेले नाही.‌ त्यामुळे या धरण प्रकल्पाचा नेमका उद्देश काय आहे? असा देखील प्रश्न उपस्थित होतो आहे. येथील ग्रामस्थ सरदेसाई यांनी सांगितले की, कॅनॉलची उंची वाढवणे किंवा अन्य कामासाठी लाख रुपये खर्च करण्यात येतो पण पाण्याचा पत्ता नसल्याने कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांच्या फायद्यासाठी हे धरण बांधले आहे का? असा देखील प्रश्न ग्रामस्थ श्रीकृष्ण सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.
या संपूर्ण याप्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी आणि धरणाच्या पाण्यासाठी येथील जागरूक नागरिक असलेले श्रीकृष्ण सरदेसाई यांनी आता थेट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहेत.