आ. किरण सामंत यांनी घेतली दखल
शुक्रवारी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन
राजापूर (प्रतिनिधी): श्री देव धोपेश्वर इनाम जमिन प्रकरणी फेरफार नोंद क्रमांक १४७८ रद्द करणे प्रकरणी तत्कालिन प्रांताधिकारी यांनी सन २०१९ मध्ये दिलेल्या आदेशाची सन २०२२ मध्ये फेरफार क्रमांक ५४९४ ने नोद करण्यात येऊनही त्याची अंमलबजाणी करण्याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीच कार्यवाही न झाल्याने या फेरफार नोंद अंतर्गत असणाऱ्या शेकडो जागा मालक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. या प्रकरणी आता आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी दखल घेतली असून याबाबत चर्चा करून अंतिम तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी २४ जानेवारी रोजी अप्पर जिल्हाधिकारी रमेश बर्गे यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
गेली कित्येक वर्षे प्रलंबीत असलेला हा प्रश्न मार्गी लागल्यास भविष्यात या जमिन मालकांना दिलासा मिळणार आहे.
या प्रकरणी सोमवारी राजापूरचे एड. शशिकांत सुतार, एड. यशवंत कावतकर यांनी आ. सामंत यांचे लक्ष वेधले होते. यावर तहसीलदार विकास गंबरे यांच्या उपस्थितीत चर्चा करून यावर अंतिम चर्चेसाठी अप्पर जिल्हाधिकारी रमेश बर्गे यांच्यासोबत शुक्रवार २४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता तहसीलदार व संबधित विभागाचे अधिकारी, जागा मालक ग्रामस्थ, वकिल यांची संयुक्त बैठक आ. किरण सामंत यांन आयोजित केली आहे.
श्री देव धुतपापेश्वर मंदिर परिसरातील जमिनी या देवस्थान इनाम म्हणून सातबारा दस्तऐवजी नोंद आहेत. मात्र यातील फेरफार क्रमांक १४७८ खाली नोंद असलेल्या मिळकतींबाबत प्राताधिकार राजापूर यांच्याकडे एक अपिल दाखल झाले होते. त्या अपिलावर सुनावणी होऊन त्यावर देण्यात आलेल्या निर्णयात फेरफार क्रमांक १४७८ खालील नोंद असलेल्या मिळकतींबाबतचा फेरफार रद्द ठरविण्यात आला. २ फेब्रुवारी २०१९ रोजी हा निकाल देण्यात आला. त्यानंतर या आदेशाचा अंमल देण्यासाठी फेरफार क्रमांक ४५९४ नोंदविण्यात आला. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी हा फेरफार नोंदविण्यात आला. या फेरफार अंतर्गत शेकडो जमिन मालकांना याचा लाभ होणार होता, त्यांचा मालक म्हणून नोंद होणार होती.
मात्र या फेरफार नोंदणी आदेशाचा त्यानंतर अंमलबजावणीच प्रशासनाकडून न झाल्याने या फेरफार मध्ये समावेश असलेल्या जमिन मालकांना त्यांच्या मालकी हक्कापासून वंचित रहावे लागले आहे. याबाबत आ. सामंत यांच्याकडे कैफियत मांडण्यात आली असून आ. सामंत यांनी सदरचा विषय हा अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली येत असल्याने शुक्रवारी २४ रोजी त्यांच्या दालनात यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन केले आहे.












