बांदा : प्रतिनिधी
देवस्थान उपसमित्यांना नवीन उपसमिती स्थापन करण्यासह समितीचा कारभार पाहतानाच्या जाचक अटीं शिथील करण्याबाबत येत्या ५ फेब्रुवारीला सावंतवाडीत जिल्हाधिकरी, देवस्थान समिती आणि देवस्थान उपसमित्या व मानकरी यांची संयुक्त बैठक लावण्याचे आश्वासन पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी देवस्थान पदाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील सर्व देवस्थानचे मानकरी आणि उपसमितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी देवस्थान समितीच्या सावंतवाडी कार्यालयासमोर पुकारलेले साखळी उपोषण स्थगित केल्याची माहिती खजिनदार विलास गवस यांनी दिली.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीने येत्या ५ फेब्रुवारीला संयुक्त बैठक घेण्याबाबत लेखी पत्र सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीला दिले. तसेच जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी संयुक्त बैठकीतून देवस्थान उपसमित्यांना नवीन उपसमिती स्थापन करण्यासह समितीचे सर्व प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली.
यावेळी सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समिती अध्यक्ष एल. एम. सावंत (कोलगाव), उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परब (आंबेगाव), सचिव राजाराम सावंत (बांदा), खजिनदार विलास गवस (वाफोली), सदस्य पंढरीनाथ राऊळ (सांगेली), सुभाष गावडे (चौकुळ), मधुकर देसाई (डेगवे), लक्ष्मण परब (चराठा), वसंत धुरी (सातोसे), यशवंत सावंत (डिंगणे), आनंद परब (मडुरा) आदी उपस्थित होते.










