जामगेत ८ व ९ फेब्रुवारी रोजी कदम घराण्याचे राज्यस्तर कुलसंमेलन

क्षत्रिय मराठा कदम परिवाराचा पुढाकार, कदम घराण्याच्या इतिहासाची उलगडणार पाने
खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील जामगे येथे ८ व ९ फेब्रुवारी रोजी क्षत्रिय मराठा कदम परिवाराच्यावतीने कदम घराण्याच्या ७ व्या राज्यस्तरीय वार्षिक कुलसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात राज्यातील कदम बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित राहून कदम घराण्याच्या इतिहासाची पाने उलगडणार असल्याची माहिती माजी सभापती अरुण कदम, रामजी कदम यांनी बुधवारी येथील विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या कुलसंमेलनात राज्यात विखुरलेल्या कदम घराण्याला संघटित करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय करून त्यादृष्टीने पुढील आखणी केली जाणार आहे. ज्येष्ठ व्याख्याते कदम घराण्यावर प्रकाशझोत टाकून खराखुरा इतिहास कदम बांधवांसमोर आणणार आहेत.
याप्रसंगी माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार विशाल पाटील, आमदार विश्वजीत कदम, राज्यमंत्री मेघना कदम-बोर्डीकर, आमदार राम कदम, आमदार बाबुराव कदम-कोहळीकर, प्रा. डॉ. सतीश कदम, उद्योजक मनोज कदम, पराग कदम, सुनील कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता कुलदेवता श्री तुळजाभवानीचा जागरण गोंधळ, रात्री ९ वाजता मागील कुलसंमेलनाचा स्लाईड शो व रात्री १० वाजता स्नेहभोजन होईल.
९. फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता कदम बंधूंचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर नावनोंदणी होईल. सकाळी ८ वाजता ग्रामदेवता श्री कोटेश्वरी मानाई देवी दर्शन झाल्यानंतर ९ वाजता गृहराज्यमंत्री कदम यांच्याहस्ते कदंब राजवंशाचा ध्वजारोहण सोहळा होईल. ९.३० वाजता स्वागत सोहळा, १० वाजता प्रास्ताविक, व्याख्यान झाल्यानंतर दुपारी १२.३० वाजता विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान बंधू भगिनींचा सन्मान होईल.