खेड(प्रतिनिधी) शेअर मार्केटपेक्षा एका कंपनीत गुंतवणूक केल्यास रकमेवर जादा परताव्याचे आमिष दाखवत तब्बल १६ लाख ४१ हजार रुपयांना ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या राजेशभाई मंगेशभाई अहिरे (३३, रा. सुरत, गुजरात) या भामट्यास येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सुरत येथे गजाआड केले.
याबाबत सचिन सदानंद सावंत ( ४७, रा. चिंचघर- प्रभूवाडी, खेड ) यांनी पोलीस ठाणेत तक्रार नोंदवली होती. ही घटना १६ मे ते २६ जून या कालावधीत घडली होती. त्यांच्या मोबाईलवर मॉर्गन स्टेनली ई ट्रेडींग मेंबर इलाईट क्लास या व्हॉटस्अॅप ग्रुपवरील ट्रेडींगसंदर्भातील एसएमएस आला. या मॅसेजद्वारे चार वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून मॉर्गन स्टेनली ई ट्रेडिंग या कंपनीमध्ये रक्कम गुंतवल्यास जास्तीत जास्त रक्कमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवल्याचे पोलीस तक्रारीत नमूद केले आहे.
एसएमएसद्वारे विश्वास संपादन करत अनोळखी व्यक्तींनी वेळोवेळी बँकांच्या विविध खात्यातून त्यांनी दिलेल्या खात्यांमध्ये सावंत यांनी ऑनलाईन रक्कम जमा केली. तब्बल १६ लाख ४१ हजार रुपयांची अनोळखी व्यक्तींनी फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी तपासाला गती दिली.
तांत्रिक मुद्यांच्या आधारे पोलीस मोबाईलद्वारे सतत केलेल्या पथकाने भामट्याचा शोध घेण्यास
सुरुवात केली. तो गुजरात राज्यातील दिडोली सुरत येथील शुभलक्ष्मी रेसिडन्सीमध्ये वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. भामट्याने फसवणूक केलेली रक्कम पोलीस पथकाच्या हाती लागली नसल्याचे समजते. या रकमेचे त्याने नेमके काय केले, याचा पोलीस कसून तपास करत आहेत. या भामट्याने आणखी कोणाची ऑनलाईन फसवणूक केली आहे का? याचाही पोलीस पडताळा करत आहेत.










