Update चिपळूण खेर्डी MIDC मधील थ्री एम पेपर मिलला लागलेली आग आटोक्यात

चिपळूण – खेर्डी MIDC परिसरातील थ्री एम पेपर मिलमध्ये दुपारी अचानक आग लागल्याने काही वेळ परिसरात धावपळ उडाली. कंपनीत मोठ्या प्रमाणात कागदाचा साठा असल्यामुळे आगीने वेग घेत ज्वाळांनी काही क्षणांतच जोर धरला. लगेचच कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आगीची माहिती मिळताच चिपळूण नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे काम सुरू केले. वाहनचालक अमोल नामुष्टे यांच्या नेतृत्वात फायरमन प्रतीक घेवडेकर, देवदास गावडे, योगेश दळवी आणि शुभम चिवलेकर यांनी शर्थीचे प्रयत्न करून अखेर आग आटोक्यात आणली.

अर्ध्या तासांपेक्षा जास्त वेळ ज्वाळा भडकत होत्या, मात्र पाणी फवारणी आणि उपकरणांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले. आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसून प्राथमिक तपास सुरू आहे.