रामेश्वर प्राथमिक शाळा तळगाव व श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय या प्रशालेंच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
मालवण | प्रतिनिधी : रामेश्वर प्राथमिक शाळा तळगाव व श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव या दोन्ही प्रशालेंच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 15 फेब्रुवारी रोजी कोकणातील पारंपारिक उत्पादने व त्यांचे महत्त्व त्यांची नावे यां सोबत व्यापार, उद्योग व पैशाची देवाणघेवाण याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने गावठी बाजाराचे आयोजन विध्यार्थ्यांच्या सहभागातून करण्यात आले.
सह्याद्रीच्या कुशीत व सागराच्या मुशीत बसलेल्या कोकणाला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. येथे पारंपारिक पद्धतीने अनेक उत्पादनने घेतली जातात. मात्र काळाच्या ओघात ही सगळी उत्पादन कालबाह्य होत चाललेली आहेत. उकडे तांदूळ, शेणखतावर पिकविलेली भाजी, सुरण, कणगी, लालमाठ, मुळ्याची भाजी, चवळी, गावठी केळी, कुळीत पिठ, कणगी, चवळीचा पाला, कोकम, शहाळ यांसह कोकणच्या लाल मातीत पिकणारी अशी कितीतरी उत्पादन मुलांनी विक्रीसाठी आणली होती. यासोबत गावठी अंडी व अन्य गावठी साहित्य यांचा गावठी बाजार भरला होता. या गावठी बाजारास विद्यार्थी शिक्षक याचबरोबर पालकांचाही मोठ्या प्रतिसाद लाभला. ग्रामस्थानीही मुलांकडील भाजी योग्य किंमत देऊन खरेदी केली. मुलांनी व्यापार करताना देवघेव, ग्राहकाशी नम्रतेने बोलणे, आपली वस्तू सरस आहे हे पटवून देणे या सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यावेळी 3 हजार 570 रुपयांची कमाई केली.
यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष उत्तम दळवी, मुख्याध्यापिका शिरोडकर यांसह प्राथमिक व माध्यमिक चे शिक्षक वृंद इतर कर्मचारी उपस्थित होते.












