संगमेश्वर तालुक्यातील माखजन ते मावळंगे हा दोन किलोमीटरचा रस्ता डांबरीकरणाचे काम महाराष्ट्र शासनाच्या बजेट मधून मंजूर असून, गेल्यावर्षी मे २०२४ अखेरीस सदर रस्त्यावर खडी पसरून व त्यावर मलमा करून रोलिंग न करतात ठेकेदार गायब झाला. यामुळें या रस्त्यावर गंभीर परिस्थिती ओढवली आहे. सगळी खडी वर येऊन रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या खडीवरून चालणे देखील मुश्किल झालं आहे, दुचाकी चारचाकी चालवणं तर सोडाच. संबंधित बांधकाम चे अधिकारी व ठेकेदार यांच्या मनमानी व बेजबाबदारपणाचा नाहक त्रास मावळंगे ग्रामस्थांना गेली आठ महिने सहन करावा लागत आहे.असा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे यांनी केला आहे. याचा ग्रामस्थांकडून देखील तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मावळंगे ग्रामस्थांचा सर्व बाजार रहाट, वैद्यकीय सोयी, हायस्कूल जुनियर कॉलेज माखजन ला असल्याने माखजन ला आल्या वाचून पर्याय नाही. मावळंगे ते माखजन हा दोन किलोमीटर चा रस्ता खराब असल्यामुळे आजारी माणसाला माखजन ला प्राथमिक आरोग्य केंद्र वा अन्य डॉक्टर कडे यायचं झालं तर मावळंगे ते तुरळ ते आरवली ते माखजन असा २८ किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे.शाळा कॉलेजला येणाऱ्या मुलांची तर या उखडलेल्या खडी वरुन चालताना खूपच कसरत करावी लागत आहे. आता लग्नसराई सुरू झाली असल्याने मावळंगे गावाचा लग्नासाठी जाण्यासाठी फार वर्षांपूर्वीची असलेली चिऱ्याच्या पाखडी चा ग्रामस्थानी शोध लावला असून ,ती साफसफाई करून त्या पखाडीने त्याना पायपिट करावेच लागत आहे. डांबरीचा रस्ता नको पूर्वीचा मातीचा होता तो बरा होता अस म्हणण्याची वेळ आली आहे. मावळंगे गावात राहणारी माणसे आहेत जनावर नाहीत याची तरी संबंधित सार्वजनिक बांधकामांचे अधिकारी व ठेकेदार यांनी लाज बाळगायला हवी होती अशी संतप्त भावना सुरेश भयाजे यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केली.शिवाय जर पंधरा दिवसात सदर रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे मत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे यांनी व्यक्त केले.












