मिठबांव रामेश्वर देवस्थान उत्सवा वरील स्थगितीची मागणी फेटाळली

देवगड: मिठबांव गावचे प्रमुख ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर आणि त्याअंतर्गत येणाऱ्या श्री रवळनाथ, पावणाई, गजबादेवी इत्यादी १२ देवस्थानांवरील उत्सवांवर प्रतिबंध लावण्याची मागणी देवगड न्यायालयाने फेटाळली आहे.

जेठे व नरे मानकरी कुटुंबियांनी या उत्सवांवर स्थगिती आणण्यासाठी जोगल, लोके, राणे, घाडी, फाटक, गुरव इत्यादी ११ मानकऱ्यांविरुद्ध ताकीद अर्ज दाखल केला होता. मात्र, देवगड दिवाणी न्यायाधीश सौ. एन. बी. घाटगे यांनी हा अर्ज नामंजूर केला.या प्रकरणात ११ मानकऱ्यांच्या वतीने अॅड. कौस्तुभ मराठे यांनी यशस्वी युक्तीवाद केला.

३०० वर्षांनंतर रामेश्वर मंदिरात वार्षिक उत्सव सुरू

मिठबांव ग्रामदैवत रामेश्वर मंदिरात तब्बल ३०० वर्षांनंतर वार्षिक उत्सव सुरू होत असल्याने दि. २५ व २६ डिसेंबर २०२४ रोजी तरंग प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन देवस्थान समितीने केले होते.

याला आक्षेप घेत जेठे व नरे मानकरी कुटुंबियांनी देवगड न्यायालयात दिवाणी दावा दाखल करत, ११ मानकऱ्यांनी परंपरा डावलल्याचा आरोप केला. तसेच देवस्थानात कोणताही उत्सव साजरा होऊ नये यासाठी अंतरिम ताकीद आदेशाची मागणी केली होती.

मात्र, सुनावणीनंतर न्यायालयाने हा ताकीद अर्ज फेटाळल्याने रामेश्वर देवस्थानातील सर्व वार्षिक उत्सव सुरळीत पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयामुळे मिठबांव गावातील श्रद्धाळूंमध्ये उत्साहाचे वातावरण असून, उत्सव साजरे करण्यास कोणतीही अडचण राहिली नाही.