देवराहाटीच्या जमिनी तात्काळ देवस्थानांच्या नावे न केल्यास जनआंदोलन छेडणार

महाराष्ट्र मंदिर महासंघाचा इशारा!

चिपळूण (प्रतिनिधी) : रत्नागिरीतील अनेक देवरहाटी व गावरहाटीच्या जमिनी शासनाने परस्पर ताब्यात घेतल्या आहेत. या सर्व जमिनी शासनाच्या ताब्यातून मुक्त करून त्या तात्काळ देवस्थानच्या नावे न केल्यास जनआंदोलन छेडणार, असा इशारा मंदिर महासंघाच्या वतीने चिपळूण येथे झालेल्या महाराष्ट्र मंदिर न्यास जिल्हा अधिवेशनामध्ये सुनील घनवट यांनी दिला.

स्वामी मंगल कार्यालय येथे दि. २४ फेब्रुवाऱी रोजी पार पडलेल्या अधिवेशनाचा शुभारंभ सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्‌गुरु सत्यवान कदम, स्वामी स्वरुपानंद सेवामंडळ पावसचे कार्याध्यक्ष जयंत देसाई, महाराष्ट्र मंदिर महासंघ उत्तर रत्नागिरी जिल्हा संयोजक ह.भ.प. अभय महाराज सहस्त्रबुद्धे, निवृत्त सह धर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख, अधिवक्ता जनार्दन करपे, मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाला.

या अधिवेशनाला जिल्हाभरातून विविध मंदिरांच्या माध्यमातून ४५० विश्वस्त, प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रम्ह प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन परेश गुजराथी यांनी केले. उपस्थितांचे स्वागत व प्रस्तावना श्री. सुरेश शिंदे यांनी केली. यावेळी श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले की मंदिर सरकारी करणाविरोधात येत्या काही दिवसांत आंदोलनाच्या माध्यमातून शंखनाद पुकारायचा आहे, यासाठी संघटीत व्हा! मंदिरांच्या संघटनात्मक रचनेचा, कार्याचा एक आदर्शवत रत्नागिरी पॅटर्न तयार करूया असे आवाहन त्यांनी केले. मंदिर संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी मंदिर महासंघ हे व्यासपीठ आहे. सद्यस्थितीत देशभरात १५ हजार मंदिरांचे संघटन झाले आहे.मंदिर सरकारीकरणामुळे तामिळनाडूमध्ये अनेक मंदिरे बंद पडली आहेत. पुरोगाम्यांचे मंदिराबाबतचे नॅरेटीव्ह खोडून काढूया असेही ते म्हणाले.

यावेळी बोलतांना सद्‌गुरु सत्यवान कदम यांनी सांगितले की मंदिर हा हिंदु संस्कृतीचा वारसा आहे, तो जतन करणे महत्त्वाचे आहे. आपला धर्म, संस्कृती जीवंत ठेवण्याचे कार्य वेळोवेळी मंदिरांमुळे झालेले आहे. हिंदू समाजाची जन्म हिंदूपासून ते कर्म हिंदूपर्यंत वाटचाल होण्यासाठी मंदिर अधिवेशन हे प्रभावी माध्यम आहे.मंदिर संस्कृतीचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे. मंदिरात येणाऱ्यांना धर्माचा अभ्यास नसतो. तीर्थक्षेत्र पर्यटन क्षेत्र झाली आहेत. त्यामुळे तेथील आध्यात्मिक शक्तीचा लाभ होत नाही. मंदिरांमधून धर्मशिक्षण दिले तर त्यांची श्रद्धा वाढून सशक्त राष्ट्रभक्ती असणारी पिढी निर्माण होईल आणि ती राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात योगदान देईल. मंदिरामध्ये धर्मशिक्षण देणारे ग्रंथ भेट दिले पाहिजेत. यातून भाविक धर्मशिक्षणाच्या कृती करतील.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना निवृत्त सह धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी कायदेविषयक मार्गदर्शन करून उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन केले. धर्मादाय आयुक्त कार्यालयातील प्रक्रियांचे अभ्यासक सातारा येथील अधिवक्ता जनार्दन करपे यांनी न्यास नोंदणी तसेच मंदिरांना कार्यालयीन येणाऱ्या अडचणीसंदर्भात मार्गदर्शन केले.

जयंत देसाई म्हणाले की, आपल्या मंदिरांचे रक्षण होईल असा राजाश्रय मिळाला पाहिजे. आपण संघटित नसल्यामुळे अनेकदा आक्रमणे झाली आहेत. मात्र, आता मंदिरांचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ पुढे आला आहे, त्याचा लाभ करून घेऊया. मंदिरासाठी आपला त्याग असावा. येणाऱ्या भक्तांना सेवा देण्यासाठी तत्पर असायला हवे. यामुळे मंदिरात एक वेगळेच वातावरण निर्माण होईल, असेही ते म्हणाले.

यावेळी बोलतांना महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संघटक संजय जोशी, म्हणाले की, मंदिरे धर्माची आधारशीला आहेत. मंदिरे तोडून तेथील पावित्र्य नष्ट केले आहे. मंदिरे देशाला विश्वगुरु बनविण्याचे मुख्य केंद्र आहे. मात्र मंदिरांचे पावित्र्य टिकविण्याच्या दृष्टीचा अभाव दिसत आहे. जत्रांमधील जुगाराचे अड्डे बंद करून मंदिर संस्कृतीचे रक्षण करुया. सामुहिक आरती, सामुहिक गदा पूजन, सामुहिक गुढीपूजन असे उपक्रम सामुहिक राबवून मंदिर धर्मरक्षणासाठी संघटीत होऊया.

यावेळी दिलीप देशमुख, निवृत्त धर्मदाय आयुक्त, महेश पोंक्षे , महाराष्ट्र मंदिर महासंघ, चिपळूण तालुका संयोजक, रमेश कडू, महाराष्ट्र मंदिर महासंघ, दापोली आणि मंडणगड, लक्ष्मण गुरव, महाराष्ट्र मंदिर महासंघ, दापोली तालुका संयोजक, उमेश गुरव, सकल गुरव समाज संघटना, सुभाष गुढेकर, कृष्णा पंडित, गणेश उतेकर, प्रदीप चव्हाण, दीपक कदम- महाराष्ट्र मंदिर महासंघ जिल्हा कार्यकारिणी सदस्य आदी उपस्थित होते.