आ. दीपक केसरकर यांच्या दौऱ्याबाबत फळबागायतदार शेतकरी संघटनेची नाराजी
बांदा : प्रतिनिधी : सिंधू रत्न समितीचे अध्यक्ष आ. दीपक केसरकर हे काजू बोंडूवर प्रक्रिया व त्यापासून होणारी उत्पादने यावर अभ्यास करण्यासाठी ब्राझीलच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. सिंधू रत्न योजनेतून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक बळ वाढण्यासाठी दीपक केसरकर यांनी स्तुत्य कार्यक्रम राबविला आहे. सदर ब्राझील दौऱ्यात अनुभवी शेतकऱ्यांना निमंत्रित करणे अपेक्षित होते, अशी नाराजी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विलास सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केली आहे.
ते म्हणतात, सिंधूरत्न योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक शेतीची अवजारे यापूर्वी अनुदानावर प्रदान करण्यात आली आहेत. नवीन प्रजातीची हळद, सुरण इत्यादीची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित करण्यासाठी वेगवेगळी कृषी प्रदर्शनेही आयोजित केली आहेत. काजू बोंडूवर प्रक्रिया व त्यापासून होणारी उत्पादने यावर अभ्यास करण्यासाठी आ. दीपक केसरकर हे नुकतेच ब्राझीलच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
त्याबद्दल सिंधुदुर्ग बागायतदार शेतकरी संघातर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो.
या दौऱ्यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे शास्त्रज्ञ समाविष्ट आहेत. अशा दौऱ्यात तज्ञ व्यक्ती नेणे आवश्यक आहे याबद्दल दुमत नाही. परंतु त्यांच्या समवेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तज्ञ व अनुभवी शेतकरीही नेले असते तर ते आणखी योग्य ठरले असते. जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये प्रचार व प्रसार झाला असता. अनुभवी शेतकऱ्याचा सल्लाही कृषी शास्त्रज्ञाना आवश्यक असतो. कारण शेतकरी हा सुद्धा एक प्रकारचा शास्त्रज्ञ असतो. सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील अनेक अनुभवी काजू शेतकऱ्यांचा यापूर्वी वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र व तत्सम विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन घेतले आहे. मात्र, ब्राझील दौऱ्यात शेतकऱ्यांना डावलण्यात आल्याची खंत व्यक्त केली.












