दापोली l प्रतिनिधी-महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दापोली शहर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.या प्रतिष्ठानच्या सौजन्याने रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सकाळी 8. वाजता दापोली शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. ही स्वच्छता मोहीम स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छता दूत डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. श्री. आप्पा साहेब धर्माधिकारी व डॉ श्री. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे.
या शहर स्वच्छता अभियानामध्ये दापोली शहरातील रस्ते तसेच दापोलीतील पंचायत समिती कार्यालय परिसर, प्रांत कार्यालय परिसर ,दापोली तहसीलदार कार्यालय परिसर इत्यादी भागाची स्वच्छता करण्यात येणार आहे. या स्वच्छता अभियान कार्यक्रमात दापोली तालुक्यातील श्रीसमर्थ बैठक मधील सर्व श्री सदस्य सहभागी होणार आहेत.तरी या स्वच्छता कार्यक्रमात दापोलीतील नागरिकानी देखील सहभागी होण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.











