खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील तिसे येथील श्री काळकाई देवस्थानच्यावतीने श्री देवी काळकाईचा शिमगोत्सव साजरा होत असून सात दिवस १० वाड्यांमध्ये पालखी फिरल्यानंतर २१ मार्च रोजी गावदेवी मंदिरात शिंपणे कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होणार आहे.
येथील शिमगोत्सवास जत्रोत्सवाने प्रारंभ झाला. गेले दोन दिवस देवीच्या पालखीने गावातील शिगवणवाडी, मधलीवाडी, जोगळेवाडी, मोहनेवाडी, मूकनाकवाडी येथील मानकऱ्यांची व ग्रामस्थांची घरे घेऊन दर्शन दिले. १७ रोजी पड्याळवाडी, गवळवाडी, १८ रोजी सकपाळवाडी, १९ रोजी शिंदेवाडी, २० रोजी झगडेवाडी येथील भाविकांची घरे घेणार आहे.
२१ रोजी गावदेवी मंदिर परिसरात शिंपणे कार्यक्रमाने गावातील शिमगोत्सवाची सांगता होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष वसंत शिगवण, सचिव दामोदर कदम, खजिनदार परशुराम शिंदे, थळश्री सुनील शिगवण, पुजारी संतोष शिगवण, मानकरी सुरेश शिगवण यांच्यासह पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.










