
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेनंतर शिवसैनिक आक्रमक
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कॉमेडियन कुणाल कामराने वादग्रस्त कविता लिहिल्यानंतर आता त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली असून शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आ. निलेश राणे यांनीही आपल्या स्टाईलने कुणाल कामराला इशारा दिला आहे.
कुणाल कामरा या कॉमेडियनने राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक आक्षेपार्ह कविता केली असून ती सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्याला उबाठा शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी पाठिंबा दिल्याने या सगळ्या प्रकाराला उबाठाचा पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. ज्याचा व्हिडीओ हा संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केला. मात्र आता या कवितेनंतर राज्यात याचे तीव्र पडसाद उमटत असून शिवसैनिक आक्रमक झाल्याचे बघायला मिळतंय.
खारच्या ज्या हॉटेलमध्ये कुणालचा शो झाला, त्याच हॉटेलवर शिवसैनिक हे पोहोचले आणि त्यांनी तिथे तोडफोड केली. कुणाल कामराला माफी मागण्यासाठी शिवसेनेने अल्टीमेटम देखील दिलंय. त्याचवेळी शिवसेनेचे कोकणचे नेते कुडाळ मालवणचे आ. निलेश राणे यांनीही आपल्या आक्रमक शैलीत कुणाल कामराला इशारा दिला आहे. ‘’ कुणाल कामरा जिथे दिसला तिथे त्याला फटके टाकणार’’ असा ईशारा आ. निलेश राणे यांनी आपल्या एक्स हँडल वरून दिला आहे. त्यामुळे जोपर्यंत कामरा माफी मागत नाही तोपर्यंत शिवसैनिक शांत बसणार नाही हे स्पष्ट झाले आहे.












