हिंदु जनजागृती समितीचे आयोजन : स्वच्छता, गडभ्रमंती व घेतले स्वसंरक्षणाचे धडे
वेंगुर्ले | दाजी नाईक : रेडी येथील यशवंतगड किल्ल्यावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवारी ‘एक दिवस शिवरायांच्या सानिध्यात’ ही मोहीम घेण्यात आली. मोहिमेच्या अंतर्गत किल्ल्याची स्वच्छता, श्री भवानी देवीचा नामजप, गड भ्रमंती आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणच्या माध्यमातून बलोपासना करण्यात आली.
समितीच्या वतीने यशवंतगड किल्ल्यावरील श्री गणेशाच्या चरणी श्रीफळ अर्पण करून आणि प्रार्थना करून, तसेच गडावरील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या मोहिमेला प्रारंभ केला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. विरेश माईनकर यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी स्वच्छता करताना किल्ल्यावरील पाला पाचोळा, प्लास्टिक कचरा, गवत काढून काटेरी झाडी तोडण्यात आल्या.
या मोहिमेला जिल्ह्यातील ६० मावळे आणि रणरागिणी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शिवप्रेमी यशवंतगड या स्थानिक शिवप्रेमी संघटनेचे श्री. अभिषेक रेगे यांनी सर्व धर्मप्रेमींना गडाचा इतिहास सांगून सर्वांमध्ये शौर्य निर्माण केले. मोहिमेच्या सांगतेवेळी ‘हिंदुराष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा’ घेऊन सर्व मावळे हिंदुराष्ट्रासाठी कटिबध्द झाले.
यावेळी ‘यशवंतगड शिवप्रेमी’ संघटनेचे सर्वश्री अभिषेक रेगे, शुभम नाईक, एकनाथ गुरव, नितीन मेस्त्री, कु. वैशाली वडार, संपदा राणे, सिया गावकर आदी उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री. शिवराम देसाई, आनंद धानजी, सिद्धेश केरकर, सुनिल मसुरकर उपस्थित होते.
दरम्यान यावेळी स्थानिक शिवप्रेमी संघटना ‘यशवंतगड शिवप्रेमी’ यांनी सुद्धा गड मोहिमेत उस्फूर्तपणे सहभाग घेतला. मोहीम यशस्वी होण्यासाठी सौ. राजश्री वेलिंग, सौ. तेजा सावंत तसेच अन्य स्थानिक धर्मप्रेमींचे मोलाचे सहकार्य लाभले. आपल्या सर्वांवर भगवंताची कृपा असल्यामुळेच तुम्ही या गडमोहिमेत सहभागी झालात असे गौरवोद्गार स्थानिक शिवप्रेमी श्री. अभिषेक रेगे यांनी काढले आणि समितीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.












