पुढची २५ वर्षे वेंगुर्ले न.प.वर फक्त शिवसेनेचाच झेंडा फडकणार…
वेंगुर्ले माणिक चौक येथील शिवसेनेच्या प्रचार सभेला मोठा प्रतिसाद
वेंगुर्ले l दाजी नाईक :नगरपालिका हे आपले मंदिर आहे. तिथे पवित्रच लोकं गेली पाहिजेत. अपवित्र लोकांचे ते काम नाही. म्हणून शिवसेनेने चांगले उमेदवार या निवडणुकीत दिले आहेत. शिवसेना सिंधुदुर्गात सोडा महाराष्ट्रात कोणापेक्षा कमी नाही. आमदार दीपक केसरकर यांना निवडणूक कशी जिंकायची हे आपण सांगूच शकत नाही. कारण ते युनिव्हर्सिटी आहे. आम्ही जेव्हा तिकडे होतो तेव्हाही सगळ्या निवडणूका आम. केसरकर जिंकायचे. आम्हाला हैराण करून सोडायचे. आम. केसरकर ज्याप्रमाणे लोकांच्या मनात घर करतात, त्याचप्रमाणे नागेश उर्फ पिंटू गावडे तुम्ही लोकांच्या मनात असं घर करा की पुढची २५ वर्षे वेंगुर्ले नगरपरिषदेवर फक्त शिवसेनेचाच झेंडा फडकला पाहिजे. कोणी मार्केटींग केले हे सोडून द्या, कोणी अन्याय केला हे सोडून द्या. आपण असू किंवा नसू पण येणाऱ्यांनी शिवसेनेचाच झेंडा नगरपरिषदेवर फडकवला पाहिजे अस काम करा. विजय आपलाच आहे. ३ तारीखला विजयी मिरवणुकीत मी येणार आहे, त्यामुळे मोठ्या मताधिक्याने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश उर्फ पिंटू गावडे आणि सर्व नगरसेवकांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी वेंगुर्ले येथे बोलताना केले.
वेंगुर्ले माणिक चौक येथे शिवसेनेतर्फे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार राणे बोलत होते. त्यांच्यासोबत व्यासपीठावर आम. दीपक केसरकर, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, संपर्क प्रमुख निलेश मोरे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश उर्फ पिंटू गावडे, सुनील डूबळे, सचिन देसाई, सुहास कोळसुलकर, काशिनाथ नार्वेकर, बाळा दळवी, उमेश येरम, महिला तालुकाप्रमुख शीतल साळगावकर, महिला शहर प्रमुख ॲड श्रद्धा बाविस्कर यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निलेश राणे पुढे म्हणाले की, वेंगुर्ल्याच्या विकासाचा अहवाल वाचला. मी रत्नागिरीतही काम करतो. मंत्री उदय सामंत यांची माफी मागून सांगतो. असा विकासाचा अहवाल ना मी रत्नागिरी पाहिला ना सिंधुदुर्गात. वेंगुर्ल्यातील प्रत्येक प्रभागात कोट्यावधी रुपयांचा निधी आला. फक्त निधी आलाच नाही, तर आलेला निधी कशाप्रकारे खर्च केला याची सविस्तर माहिती या अहवालामध्ये आहे. या अहवालाची कॉपी मला मालवणात करावीच लागणार. आधी मला वाटायचं वेंगुर्ल्यातील विकास काम हे एक माणूस करतो. त्यांचीच प्रसिद्धी व्हायची. नंतर मला समजल की सचिन वालावलकर यांचे ते मित्रच होेते. मित्रासाठी तुम्ही काय काय केलंत. आता मला तुमचा मित्र समजा. आम्हाला बाहेरून वाटत की, वेंगुर्ल्याचा विकास हा एका अमुक व्यक्तीने केला. परंतु, मी जेव्हा आमदार झालो तेव्हा समजले ते फक्त नामधारी होते. खरा विकास करणारे फक्त केसरकर आणि वालावलकर होते. काय मस्त मार्केटींग आहे, करतय कोण आणि खातयं कोण? ज्यांनी हे सगळं उभं केलं त्यांना सांगाव लागतय की हे सर्व मी केलं. कारण त्यांनाही खाताहेत. हे सर्व दुदैव आहे. केसरकर यांच्या वजनामुळे हे सगळं घडू शकलं. नाहीतर साध्यासुध्या माणसाचं ते काम नाही. स्वभावाने शांत असणारे केसरकर रिझल्ट देतात. नागेश गावडे दहा वर्षे भाजपामध्ये होते हे मला कळलच नाही, कारण चांगल्या लोकांना तिकडे किंमत नाही. आज खरी ओळख कोणी दिली असेल तर त्यांना शिवसेनेने. म्हणून हा पक्ष कधी विसरू नका. तुम्हाला आमिष दाखविली जातील, आतापर्यंत पोहचली सुद्धा असेल. लक्ष्मीला वाईट वाटेल असे करू नका. येणारे सगळे घ्या पण शिवसेनेच्याच उमेदवारांना निवडून द्या. वेंगुर्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेने शिवाय पर्याय नाही असेही त्यांनी सांगितले.
*वेंगुर्लेतील नागरिक सुज्ञ आहेत त्यांना योग्य आणि अयोग्य काय ते माहित : आम. दीपक केसरकर*
वेंगुर्ला मध्ये काम करायला मिळावं ही माझी इच्छा होती. बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेले शहरातील दोन महत्त्वाचे रस्ते नागरिकांच्या हितासाठी नगरपरिषदेच्या ताब्यात आणले. दोनवेळा दुकानदारांना दुकाने काढण्याच्या नोटीस दिल्या होत्या. परंतु, दोन्हीवेळा त्याला स्थगिती दिली. म्हणून आपली बाजारपेठ आहे तशीच राहिली. पैशाने मते विकत घेणे म्हणजे मोठ्ठा पराक्रम नसतो. येथील जनता सुज्ञ आहे. त्यांना योग्य आणि अयोग्य काय ते माहित आहे, असे प्रतिपादन आमदार दीपक केसरकर यांनी केले.
शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी बोलताना सांगितले की, आमदार म्हणून काम करत असताना दीपक केसरकर यांनी पक्षभेद केला नाही. कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असला तरी त्याठिकाणी निधी दिला आहे. गेल्या चार वर्षामध्ये १०० कोटींचा विकास निधी वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये आणला आहे. विरोधी पक्ष नेते विकास निधीच्या जोरावर मते मागत आहेत, त्यांनी कशाप्रकारचा विकास केला हे जनतेला दाखवून द्यावे. असे आव्हान वालावलकर यांनी दिले. तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश गावडे यांनी बोलताना सांगितले की, गत निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निवडून आणण्यामध्ये माजी नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांचा सिंहाचा वाटा होता. असे सांगून आपण सामाजिक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्या म्हणूनच पुढेही काम करेल असे त्यांनी सांगितले.












