कोकण रेल्वेचे विस्कळीत वेळापत्रक पूर्ववत

खेड (प्रतिनिधी) कोकण  रेल्वे मार्गावरील कळंबणी दिवाणखवटी
रेल्वेस्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटून रेल्वेगाड्यांचे विस्कळीत झालेले वेळापत्रक बुधवारी पूर्ववत झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. २ तासातच कोकण रेल्वेच्या इलेक्ट्रीक आपत्कालीन यंत्रणेने तुटलेल्या ओव्हरहेड वायरची जोडणी करत बिघाड दूर केला होता.
मुंबईला जाणारी मांडवी, मडगाव-बांद्रा व गोवा संपर्कक्रांती एक्स्प्रेसच्या प्रवाशांची रखडपट्टी झाली होती. मुंबईहून येणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्याही वेळापत्रकावर परिणाम झाला होता. बुधवारी सकाळी १ तास उशिराने धावलेल्या तुतारी एक्प्रेसचा अपवाद वगळता सर्वच रेल्वेगाड्या नियोजित वेळेत मार्गस्थ झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.