सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. हा समारंभ दोन टप्प्यात, दिनांक २९ मार्च आणि २ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, संस्थेचे सहाय्यक संचालक ॲड . शामराव सावंत, संस्थेचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत आणि डॉक्टर सतीश सावंत यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. यासोबतच पालक शिक्षक संघाचे सदस्य देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि राजमाता यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आणि पारितोषिक वितरणाला सुरुवात झाली. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये शाळेत आयोजित विविध सहशालेय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट यश मिळवलेल्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्रक आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह वातावरणात भरून राहिला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत शिक्षिका श्रीम. इंतिजिया फर्नांडिस यांनी केले. इयत्ता पहिली ते चौथीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रीम. हीना शेख यांनी तर पाचवी ते दहावीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. इंतिजिया फर्नांडिस यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन शिक्षिका श्रीम. अर्चिता सुभेदार यांनी केले.
या शानदार कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, संस्थेचे सर्व सदस्य तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. अनुजा साळगावकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ आणि माता पालक संघ कार्यकारी समितीच्या सदस्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












