खेड न.प.चा निर्णय ; कचरा फेकताना निदर्शनास आल्यास संपर्काचे आवाहन
खेड(प्रतिनिधी)
खेड नगर परिषदेने माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहर कचरामुक्त निर्माण करण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र दुसरीकडे भर रस्त्यासह नदी व गटारात सर्रासपणे फेकला जात असून यापुढे कचरा फेकणारे कारवाईच्या कचाट्यात अडकणार आहेत. कुठेही कचरा टाकताना आढळल्यास तातडीने नगर प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी केले आहे.
नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून दिवसाकाठी ८ टनहून अधिक कचऱ्याची विल्हेवाट लावून शहर चकाचक ठेवण्यावर भर देण्यात येत आहे. एकीकडे शहर स्वच्छतेसाठी नगर प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे मात्र जगबुडी नदीसह गटारे व मोक्याच्या ठिकाणी कचरा टाकून परिसर अस्वच्छ केला जात आहे.
नदीपात्रातही नजर चुकवून कचरा टाकला जात असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे या बाबत नगर प्रशासन आता कहक पावले उचलणार असून यापुढे गटारे, रस्ते अथवा नदीपात्रात कचरा टाकताना आढळल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नागरिकांनी नगर प्रशासनाला सहकार्य करत रस्त्यावर कचरा टाकण्यास मज्जाव करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा कुठेही कचरा टाकताना निदर्शनास आल्यास ८८५७०७७०९९ या नं वर संपर्क साधावा, असे आवाहनही नगर प्रशासनाने केले आहे.










