काम निकृष्ट असल्याचा आरोप; सचिन मोरे यांचे आझाद मैदानावर उपोषण सुरू
खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील वडगाव बुद्रुक येथे नदीवर सुमारे ५० लाख रुपये खर्चुन बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी येथील ग्रामस्थ सचिन मोरे ७ एप्रिलपासून मुंबई येथील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व संबंधितांना निवेदन देऊन कळवले आहे.
खेड तालुक्यातील वडगाव बुद्रुक येथील नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याबाबत ग्रामस्थ सचिन मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मुख्य सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग प्रधान सचिव संजय खंदारे यांना निवेदन देऊन वडगाव बुद्रुक नळ पाणीपुरवठा योजना या एकूण १ कोटी ३ लाख २३ हजार ८१४ रुपयांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. या कामाला दि. १० मे २०२२ रोजी तांत्रिक मान्यता मिळाली होती. त्यानंतर शिवरत् कन्स्ट्रक्शन चिपळूण प्रोप्रा. प्रसाद प्र. आवले या फर्मला दि.२२ डिसेंबर २०२२ रोजी कार्यारंभआदेश देण्यात आला.
ही योजना दि.३० मार्च २०२४ रोजी पूर्ण करण्याचे नियोजन होते. परंतु, ही योजना ज्या नदीपात्रावर अवलंबून आहे, ते नदीपात्रात बाढण्यात येत असलेला बंधारा आजपर्यंत पाणी साठवण्यायोग्य तयार करण्यात आलेला नाही. या बंधाऱ्याचे कामाकडे संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केलेले आहे. संबंधित शासकीय अधिकारी हे देखील या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे.
लोखंडी दरवाजा बसविणेसाठी लोखंडी चॅनल बसविण्यात आले आहेत; पण त्याचा आकार कमी असून ते काँक्रीटमध्ये व्यवस्थित बसविण्यात आलेले नाहीत. पावसाळ्यात येथे पाण्याचा प्रवाह अधिक वेगवान असतो त्यामुळे बंधारा बांधण्यासाठी वापरलेले साहित्यदेखील पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेले आहेत. गत पावसाळ्यामध्ये पाणीसाठा होण्याऐवजी दगड गोट्यामुळे अर्धा अधिक बंधारा भरला आहे. बंधाऱ्याचे काम पूर्णपणे निकृष्ट
झाले आहे. त्यामुळे या कामाची पाहणी करून चौकशी व्हावी म्हणून अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्यचे कार्यकर्ते सचिन मोरे आझाद मैदान मुंबई येथे दआमरण उपोषण सुरू केले आहे
बंधारे बांधण्याच्या नावाखाली लाखोंची लूट : मोरे
काही वर्षापूर्वी या बंधाऱ्याच्या खाली पाचशे मीटरवर काँक्रीट बंधारा बांधण्यात आला होता. त्याचेही काम निकृष्ट पद्धतीने केलेले होते. त्या बंधाऱ्यामध्ये एकही वर्ष पाणीसाठा झालेला नाही. वडगावमध्ये नदीवर बंधारे बांधण्याच्या नावाखाली केवळ सरकारी तिजोरीतून लूट सुरू आहे. त्यामुळे संथगतीने व निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदार यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करून काळ्या यादीत टाकावे, संबंधित उपअभियंता यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी. सदर कामाची चौकशी पूर्ण होईपर्यंत कामाचे बिल अदा करू नये, अशा मागण्या आम्ही केल्या आहेत, अशी माहिती आंदोलनकर्ते सचिन अनाजीराव मोरे यांनी बोलताना दिली









