तालुका पत्रकार संघाची मागणी मुख्याधिकार्यांना निवेदन
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरासह तालुक्यातील पत्रकारांसाठी नगरपरिषदेतर्फे उपलब्ध करून दिलेला व सद्यस्थितीत पूर्णपणे दुरावस्थेत असलेला पत्रकार कक्ष अद्ययावत करण्यात यावा अशी मागणी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची भेट घेत केली. त्यावर येत्या ४ दिवसांत स्वतः या पत्रकार कक्षाची पहाणी करून पत्रकार कक्ष सुस्थितीत केला जाईल, असं आश्वासन मुख्याधिकार्यांनी यावेळी दिले.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे, प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष अनंत जाधव, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे सचिव मयुर चराठकर, सहसचिव विनायक गांवस, उपाध्यक्ष दीपक गांवकर, प्रसन्न राणे, सदस्य नरेंद्र देशपांडे, प्रेस क्लबचे रूपेश हिराप आदी उपस्थित होते.
सदर पत्रकार कक्षातील खूर्च्या टेबल व अन्य फर्निचर जीर्ण झाले आहे. तसेच अन्य साहित्य नसल्यामुळे पत्रकार कक्षाचा वापर करता येत नाही. तरी पत्रकार कक्षाची दुरुस्ती रंगरंगोटी आणि फर्निचरसह वातानुकूलित पत्रकार कक्ष तयार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.पालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलामध्ये पहिल्या मजल्यावर हा पत्रकार कक्ष आहे. पत्रकार कक्षाच्या समोरच बॅरिस्टर नाथ पै सभागृह आहे. यापूर्वी पत्रकार कक्षाच्या नूतनीकरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र, काम सुरू झाले नव्हते. त्यामुळे मुख्याधिकारी साळुंखे यांनी स्वतः लक्ष घालून पत्रकार कक्ष अद्ययावत करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.यावेळी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी येत्या ४ दिवसांत स्वतः या पत्रकार कक्षाची पहाणी करून पत्रकार कक्ष सुस्थितीत केला जाईल, असं आश्वासन त्यांनी दिले.












