खेड शहरात डास उत्पत्तीची ठिकाणे निश्चित

तालुका आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण; इमारत बांधकामाची ठिकाणे सर्वाधिक कारणीभूत, तातडीने नष्ट करण्याचे आदेश
खेड(प्रतिनिधी)शहरात पावसाळ्यात फैलावणारी डेंग्यूची साथ नियंत्रणात आणून त्यावर आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्यादृष्टीने तालुका आरोग्य विभागाच्यावतीने १७ प्रभागांमध्ये – प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व आरोग्य सहाय्यक यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार डासांच्या उत्पत्तीचे ‘स्पॉट’ निश्चित करण्यात आले आहेत.
इमारत बांधकामाच्या ठिकाणीच – डासांची सर्वाधिक पैदास होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. उत्पत्तीची ठिकाणे तातडीने नष्ट करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. राष्ट्रीय किटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी शैलेश खरडमोल यांच्या मार्गदर्शनाखाली जोखीमग्रस्त भागात कंटेनर सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आली. या सर्वेक्षणानुसार डासांच्या उत्पतीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. क्षेत्रफळनगर येथील कोकण व्हॅली इमारत बांधकाम ठिकाण, डाकबंगला रोड येथील तुंबणारी गटारे, गुलमोहर पार्क आदी बांधकामाच्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
शिवाजीनगर परिसर, महात्मा फुले नगर, बौद्धवाडी परिसर, एकविरा व साईबाबा मंदिराशेजारी तसेच दापोलीनाका परिसर, तळ्याचे वाकण येथे सुरू असलेल्या इमारत बांधकामाच्या ठिकाणी डासांची पैदास होवून डेंग्यूचा फैलाव वेगाने होत असल्याचे समोर आले आहे. तुंबणारी गटारे, साठे मोहल्ला, कुंभारआळी परिसर, साई मंदिर परिसरातील इमारत बांधकामाच्या ठिकाणी डासांची उत्पत्ती सर्वाधिक होत असल्याचे उघड झाले आहे.
डासांच्या उत्पत्ती नष्टचे आदेश
पोलीस वसाहतीतील भंगार वाहने, वाणीपेठ परिसर, तांबे मोहल्ला परिसर, गुजरआळी परिसरातील इमारत बांधकामांसह तुंबणाऱ्या गटारांमुळे डासांची उत्पत्ती होवून डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा निष्कर्ष करण्यात आला आहे. डेंग्यूची साथ फैलावू. नये, याकरिता पावसाळ्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याबाबत तालुका आरोग्य विभागाने नगरप्रशासनाला सुचित केले आहे. डासांच्या उत्पत्तीची सर्व ठिकाणे तातडीने नष्ट करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.