दोन जणांविरोधात राजापूर पोलीसांत गुन्हा दाखल
राजापूर l प्रतिनिधी : गुरांची अवैध व विनापरवाना वाहतुक करणाऱ्या दोघांना राजापुरातील गो रक्षणांनी चांगलाच दणका देत पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणी राजापूर पोलीसांनी गाडीचा चालक हुसैन अब्दुल पाटणकर रा. वाकेड लांजा, व गुरे खरेदी करणार चांदमियॉं अब्बास ठाकूर रा. परटवली राजापूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
तर अशा प्रकारे दोन गुरांची वाहतुक करण्यासाठी वापरलेला टेम्पो पोलीसांकडून जप्त करण्यात आला त्या दोन्ही गुरांना (बैल) ज्या शेतकऱ्यांकडून घेतले होते त्या शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तशी माहिती पोलीसांनी दिली आहे. बुधवारी 9 एप्रिल रोजी हा प्रकार घडला होता. जागरूक गो रक्षकांनी 12 एप्रिल रोजी हा प्रकार उघडकीस आणून अशा प्रकारे अवैध गुरांची वाहतुक करणाऱ्यांना धडा शिकवला आहे.
राजापूर तालुक्यात पुन्हा एकदा अवैध विनापरवाना गुरे वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
बुधवारी 9 एप्रिल रोजी हुसैन पाटणकर याच्या मालकीच्या गाडीतुन दोन गुरांची वाहतुक करण्यात येत असल्याची माहिती काही गो रक्षकांना मिळाली होती. लांजा ते राजापूर अशी वाहतुक केली जात होती, त्यावेळी काहींनी पाठलाग करून पडकण्याचा प्रयत्न केला असता त्याला यश आले नाही. मात्र शनिवारी 12 एप्रिल रोजी पाटणकर हा आपला टेम्पो भू गावामध्ये घेऊन गेला असता तेथील काही जागरूक ग्रामस्थ व गोरक्षकांनी त्याला याबाबत जाब विचारला. त्यावेळी त्याने अशा प्रकारे आपण गुरांची वाहतुक केल्याची माहिती दिली. सदरची गुरे ही चांदमियाँ ठाकूर यांनी लांजा तालुक्यातील गोळवशी गावातुन खरेदी केली होती व दसरची गुरे ही जनार्दन कांबळे यांच्याकडे ठेवल्याचे त्याने पोलीसांना सांगितले. त्यानंतर पोलीसांनी चांदमियाँ ठाकूर व जनार्दन कांबळे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी कांबळे याने सदरचे दोन बैल हे चांदमियाँ ठाकूर यांनी आपल्याकडे ठेवण्यास सांगितल्याने ते आपण ठेऊन घेतल्याचे पोलीसांना सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच राजापूर शहर व परिसरातील गो रक्षकांनी राजापूर पोलीस स्थानकात धडक देत संबधितांवर कठोर कारवाईची मागणी केली. राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी तातडीने या दोघांच्या विरोधात प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत व विनापरवाना गुरांची वाहतुक केली म्हणून गुन्हा करून अटक केली आहे. तर कांबळे यांच्याकडे असलेल्या त्या दोन्ही बैलांची रविवारी वैद्यकिय तपासणी करून ते दोन्ही बैल मुळ मालकांना परत देण्याची प्रक्रिया हाती घेतली.
राजापूर तालुक्यात यापुर्वीही अशा प्रकारे अवैध गुरांची वाहतुक झाल्याचे पुढे आले आहे. त्या अनेक वाहुतक प्रकरणात परटवली गावातील हा चांदमियाँ ठाकूर याचाच सहभाग असल्याचे व त्याच्या विरोधात यापुर्वीही अनेक गुन्हे दाखल झाल्याचे पोलीस दप्तरी नोंद आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलीसांनी ठाकूर याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी गो रक्षकांकडून होत आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अमित यादव अधिक तपास करत आहेत.
——————————————————-











