वेरवली खुर्द – पडवण ग्रामस्थांना बेर्डेवाडी धरणातील पाण्याची प्रतीक्षाच

पाईपलाईनचे काम पूर्ण होऊनही पाणी नाही, ग्रामस्थ संतप्त 

संतोष कोत्रे lलांजा. -: तालुक्यातील वेरवली खुर्द पडवण ग्रामस्थांना गेल्या ३८ वर्षांपासून वेरवली बेर्डेवाडी धरणातील पाण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. गावाकडे जाणार्या पाईपलाईनचे काम देखील दोन वर्षांपूर्वी पूर्ण झालेले असतानाही अद्यापही धरणातून पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे .

दरम्यान याबाबत वेरवली खुर्द- पडवण ग्राम पंचायतीच्या वतीने पाटबंधारे विभागाचे ,उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले असून, पाणी पुरवठा केव्हा होणार ? असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला आहे .

वेरवली बेर्डेवाडी धरणातून वेरवली बुद्रुक गावातील ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे वेरवली खुर्द – पडवण ही गावे मात्र या बेर्डेवाडी धरणातील पाण्यापासून अद्यापही वंचित आहेत. गेल्या ३८ वर्षांपासून या गावांतील सर्व वाड्यातील ग्रामस्थांना पाण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे .त्यामुळे पाणी वाटपाबाबत आमच्या बाबत दुजाभाव का ? असा संतप्त सवाल देखील वेरवली खुर्द -पडवण गावातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे .

वेरवली खुर्द पडवण या गावातील ग्रामस्थांना बेर्डेवाडी धरण प्रकल्पातून पिण्यासाठी व शेतीसाठी व अन्य कामासाठी पाणीपुरवठा व्हावा यासाठी बेर्डेवाडी धरणातून वेरवली खुर्द -पडवण या दोन गावांमध्ये कालव्याची पाईप लाईन देखील गेली आहे. व या कालव्याच्या पाईप लाईनचे काम देखील पूर्ण झाले आहे, असे प्रशासनाकडून ग्रामस्थांना सांगण्यात येते . पाईपलाईनचे काम पूर्ण होऊन दोन वर्ष झाली तरी देखील वेरवरी खुर्द- पडवण ग्रामस्थांना अद्यापही त्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे संपर्क साधला असता ग्रामस्थांना पुरेशी आणि स्पष्ट माहिती मिळत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

एक प्रकारे पाटबंधारे विभागाकडून वेरवली खुर्द -पडवण ग्रामस्थांची दिशाभूल केली जात असून त्यांच्या सहनशीलतेचा एक प्रकारे गैरफायदा घेत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे पाणी वाटपात पाटबंधारे विभागाने दुजाभाव करू नये.वेरवली खुर्द- पडवण ग्रामस्थांची पाण्यावाचून होणारी गैरसोय लक्षात घेता येथील सर्व ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून द्यावे.

आज ना उद्या आपल्याला बेर्डेवाडी धरणातून पाणी मिळेल अशा अपेक्षेत असलेल्या वेरवली खुर्द- पडवण ग्रामस्थांच्या पदरी आजवर उपेक्षाच पडली आहे. त्यामुळे आता या ग्रामस्थांना पाणीपुरवठा करून त्यांची गैरसोय कायमची दूर करावी, अशी मागणी वेरवली खुर्द -पडवण ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.