खेडमधील तिघांचा दोन वर्षासाठी हद्दपारीचा प्रस्ताव

खेड(प्रतिनिधी)
खेड पोलीस ठाण्याने एका सराईत गुन्हेगारासह गुरांची तस्करी करणारे दोघे अशा तिघांचा २ वर्षासाठी हद्दपारीचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आल्याची माहिती येथील पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनीही यास दुजोरा दिला असून वरिष्ठ कार्यालयाकडे उचित कार्यवाहीबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.
पोलीस ठाण्यांतर्गत फसवणुकीसह खंडणी, चोऱ्या व इतर गुन्हे अशा ६ ते ७ गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार अब्दुल्ला हुसैन नाडकर (रा. संगलट, सध्या रा. डाकबंगला) याच्या तडीपारीचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आला आहे.
गुरांची तस्करी करणाऱ्या सुरज जाधव, साहिल पवार (दोघे रा. चिंचघर-खेड) या दोघांच्याही हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आला आहे. तिघांनाही २ वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करावे, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
येथील पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आलेला प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे जाणार आहे. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल. या प्रस्तावाला प्रत्यक्षात मंजुरी मिळाल्यानंतर तिघांच्याही तडीपारीच्या उचित कार्यवाहीचे आदेश पोलिसांना देण्यात येणार असल्याचे समजते.