साटेली भेडशी येथे घरातून दोन तलवारी जप्त : दोघांना अटक

दोडामार्ग: तालुक्यातील साटेली भेडशी (थोरले भरड) येथे दोडामार्ग पोलिसांनी एका घरावर छापा टाकून दोन बेकायदेशीर तलवारी जप्त केल्या. या प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ एप्रिल २०२५ रोजी दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. हेमचंद्र खोपडे यांना गुप्त माहिती मिळाली की साटेली भेडशी येथील एका घरात बेकायदेशीररित्या तलवारी लपवून ठेवल्या आहेत. या माहितीची खातरजमा करून पोलीस निरीक्षक खोपडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पंचांसमक्ष संबंधित घराची कायदेशीर घरझडती घेतली.

या झडतीदरम्यान घराच्या स्वयंपाक खोलीत तांदळाच्या रिकाम्या गोणीत दोन तलवारी आढळून आल्या. या तलवारी घरातील मालक आरोपी अस्लम ईस्माईल खेडेकर (वय ४४) आणि त्याच घरात राहणारा दुसरा आरोपी बिलाल आलम शेख (वय ३८, मूळ रा. दोहमाना, बिहार) यांनी बेकायदेशीररित्या बाळगल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोन्ही तलवारी जप्त केल्या असून दोन्ही आरोपींविरुद्ध दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४२/२०२५, भारतीय हत्यार अधिनियम कलम ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास दोडामार्ग पोलीस करत आहेत.

या कारवाईमध्ये सिंधुदुर्गचे प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. कृषिकेश रावले, उप विभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी श्री. विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. हेमचंद्र खोपडे, पोलीस अंमलदार पोहेकॉ रामचंद्र मळगावकर, विठोबा सावंत, वसंत देसाई, रामचंद्र साटेलकर आणि मपोकों/कविता धणे यांनी सहभाग घेतला.

दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, बेकायदेशीर अग्निशस्त्रे, तलवारी, भाले, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके इत्यादी प्राणघातक वस्तू बाळगल्याची माहिती मिळाल्यास किंवा कोणतेही गैरकायदेशीर कृत्य निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तसेच पोलीस नियंत्रण कक्ष सिंधुदुर्ग येथील दूरध्वनी क्रमांक ०२३६२ २२८२०० आणि व्हॉट्सॲप क्रमांक ८२७५७७६२१३ वर कळवावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

यासोबतच, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि शांतता प्रस्थापित करणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणत्याही गैरकृत्य निदर्शनास आल्यास नागरिकांनी बेकायदेशीर जमाव करून कायदा हातात घेऊ नये. त्याबाबत त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात, पोलीस नियंत्रण कक्षात किंवा डायल ११२ हेल्पलाईनवर माहिती द्यावी. सोशल मीडियावर जातीय आणि धार्मिक भावना भडकावणारे पोस्ट शेअर करू नयेत. अशा पोस्टवर सायबर पोलीस ठाणे आणि सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलची नजर असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.