दोडामार्ग चोरी प्रकरणातील संशयिताच्या हैद्राबाद येथून मुसक्या आवळल्या

दोडामार्ग पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

दोडामार्ग | प्रतिनिधी : दोडामार्ग शहरात भरवस्तीमधील फ्लॅट फोडणाऱ्या हैद्राबाद येथील भामट्याच्या मुसक्या पोलिसांनी त्याच्याच गावी आवळून ताब्यात घेतले. मोहम्मद सोहेल गुलाम मोहम्मद (२४, रा. गोवळकोंडा जमाल मुंडा) असे त्याचे नाव आहे. तो सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करीत होता. अखेर पोलीसी हिसका दाखविताच त्याने चोरीची कबुली दिली. सदर संशयिताला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर यांनी सांगितले.

दोडामार्ग नगर पंचायत गार्डन नजीकच्या पद्मावती प्लाझा मधील पुंडलिक गवस यांचा फ्लॅट ३१ डिसेंबर रोजी भर दिवसा फोडला होता. यात रोख ६८ हजार रुपये, सुमारे २० हजार रुपये किमतीची अंगठी व एक किमती मोबाईल चोरट्याने लंपास केला होता. याबाबत पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली होती.

पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या चोरीचा तपास सुरू होता. मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेज याद्वारे चोरट्याचा तपास करण्यात आला होता. मोबाईल लोकेशन नुसार संशयित हैद्राबाद येथे असल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यामुळे तपासी अधिकारी जयेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंद नाईक, हवालदार विठोबा सावंत व चालक यांचे पथक हैदराबाद येथील गोवळकोंडा या गावी दाखल झाले. स्थानिक पोलिसांची मदत घेत संशयित चोरट्याला ताब्यात घेतले. यावेळी संशयिताने पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे देऊन गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी चोरीची कबुली दिली.

ईअर इंडींगसाठीआपण जीवाचा गोवा करण्यासाठी गोव्यात आलो होतो. दरम्यान दोडामार्ग मध्ये आलो असता पद्मावती प्लाझा मधील फ्लॅट बंदावस्थेत दिसला. आजूबाजूला कोणी नसल्याने आपण तो फ्लॅट फोडून रोख रक्कम व ऐवज लंपास केल्याचे त्यांनी कबूल केले. त्यानंतर त्याला दोडामार्ग येथे आणण्यात आले व चोरीचा गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दोडामार्ग पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.