रत्नागिरीतील केळ्ये येथे १४ मे रोजी विनामूल्य व्रतबंध सोहळ्याचे आयोजन

अहिल्यानगरचे श्री दत्त देवस्थान, रामकृष्ण आनंदवनाचे नियोजन

रत्नागिरी : विनामूल्य सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजित श्री दत्तदेवस्थान (अहिल्यानगर) आणि रामकृष्ण आनंदवन यांच्या सहयोगाने रत्नागिरीजवळील केळ्ये या गावी १४ मे रोजी करण्यात आले आहे. याकरिता नाव नोंदणी १० मेपर्यंत करता येईल.


प. पू. श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने वेदविद्या संरक्षण व संवर्धन कार्याचा भाग म्हणून विनामूल्य सामुदायिक व्रतबंध सोहळा श्री दत्त देवस्थान ट्रस्ट (अहिल्यानगर) आणि श्रीरामकृष्ण आनंदवन, रत्नागिरी (बापट परिवार) यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे.
 
मौंजीबंधन, उपनयन आणि व्रतबंध हे एकाच अर्थाचे शब्द असून, याचा गाभा म्हणजे धर्मदंड स्वीकारणे आणि धर्मशील जीवनाची सुरुवात करणे. स्नान, संध्या आणि गायत्री जप ही या संस्काराची मूलतत्त्वे आहेत. गायत्री उपासना हे वेदांचे सार असून, हेच पूज्य गुरूंच्या कार्याचे प्रमुख अंग आहे. या व्रतबंध सोहळ्यात सहभागी होणाऱ्या बटूंना आणि बटूसह ५ व्यक्तींना (त्याच दिवशी व आदल्या दिवशी) राहण्याची व जेवणाची व्यवस्था विनामूल्य केली जाणार आहे.

श्रीरामकृष्ण आनंदवन, रत्नागिरी, मुक्काम पोस्ट – केळये, आंबेकोड, मजगाव, विमानतळ रोड, रत्नागिरी – ४१५६१२ येथे मौंजीबंधन होणार आहे.  या सोहळ्याच्या अनुषंगाने आपल्या वेद पाठशाळेतील विद्यार्थ्यांची यावर्षाची सहल रत्नागिरी व आजूबाजूचा परिसर गणपतीपुळे, स्वामी स्वरूपानंद मठ, पावस येथे आयोजित केली आहे. आपल्या वेदपाठशाळेच्या  विद्यार्थ्यांच्या आनंदात आपण जरूर सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी गिरीश बापट (९८२००२३१०६) आणि पूजा बापट (९८२००७१४७१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.