Nashik: Railway police intercepted child trafficking, five arrested
मनमाड : बिहारमधून सांगली आणि पिंपरी-चिंचवडला मदरशांमध्ये प्रवेशासाठी नेणाऱ्या ५९ मुलांना रेल्वे पोलिस आणि आरपीएफने मनमाड आणि भुसावळ येथे ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवले आहे. एका प्रवाशाला संशय आल्याने त्यांनी ट्विटद्वारे रेल्वे प्रशासनाला माहिती दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मुलासोबत असलेल्या चार शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील ८ ते १६ वर्षे वयोगटातील ५९ मुले आणि ४ शिक्षक (मौलाना) दानापूर एक्स्प्रेसने सांगली आणि पिंपरीला जात होते. त्यांनी तिकिटेही आरक्षित केली होती. पण एवढी मुले रेल्वेने का प्रवास करत आहेत, या मुलांची तस्करी होत नाही का? एका प्रवाशाला याचा संशय आल्यानंतर त्याने ट्विटद्वारे रेल्वे प्रशासनाला माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने भुसावळ आणि मनमाड आरपीएफशी संपर्क साधून याची खातरजमा करण्यास सांगितले. त्यानुसार भुसावळ आरपीएफने 38 तर मनमाड आरपीएफने 21 मुलांना ट्रेनमधून ताब्यात घेऊन रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. रेल्वे पोलिसांनी सर्व मुलांची आणि त्यांच्या सोबत असलेल्या शिक्षकाची (मौलाना) चौकशी केल्यानंतर मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आणि सोबत असलेल्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या मुलांना मदरशात प्रवेश देण्यासाठी पालकांची संमती घेण्यात आली होती का? त्यांना इतक्या दूरच्या मदरशांमध्ये का पाठवले गेले? यामागे काही आर्थिक व्यवहार तर नाही ना? पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती दिली आहे.
संशयित पोलिसांच्या ताब्यात
भुसावळ रेल्वे स्थानकावर मुलांसोबत असलेल्या मोहम्मद अंजूर आलम मोहम्मद सय्यद अली (वय ३४, रा. सांगली) याच्याविरुद्ध कलम ३७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला कोर्टात हजर केले असता त्याला 5 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.मनमाड रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर कोर्टात हजर केले. न्यायालयाने चौघांना 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सद्दाम हुसैन, नोमान सिद्दीकी, मोहम्मद शाहनवाज आणि एजाज सिद्दीकी अशी या चौघांची नावे आहेत.
त्यांच्या पथकाने कारवाई केली
दानापूर एक्स्प्रेसमधून अल्पवयीन मुलांना बालमजुरीसाठी नेले जात असल्याची माहिती जळगावातील एका सामाजिक संस्थेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एपीआय भाऊसाहेब मगरे, एएसआय प्रकाश थोरात, संतोष शेठे, अवधेश कुमार व रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे इतर कर्मचाऱ्यांनी दानापूर एक्स्प्रेसमधील मुलांचा शोध सुरू केला. या सर्व मुलांना प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उतरवण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय घेरडे करीत आहेत.











