संतोष वायंगणकर :डॉक्टरी पेशाचा सेवाभाव शेवटच्या श्वासापर्यंत जपत गोरगरीबांचा देवदूत, आधारवड बनलेल्या डॉ. प्रमोद प्रभाकर वालावलकर यांचं ५८ व्या वर्षी निधन झाले. डॉ. प्रमोद वालावलकर हे नाव घेताच आजच्या कटप्रॅक्टीसच्या जमान्यात डॉ.प्रमोद वालावलकर यांच्यासारख्या विनम्र स्वभाव, गरीब, श्रीमंत हा भेदभाव नाही. फक्त येणाऱ्या रूग्णांना चांगली सेवा कशी देता येईल यासाठी सतत धडपडणारे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे. मुंबईत डॉक्टरकीचे शिक्षण घेतलेल्या डॉ.प्रमोद वालावलकर यांनी शासकीय रूग्णालयाच्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या जनतेची अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सेवा केली. माणुसकीचं दर्शन डॉ. वालावलकर यांच्या सेवेतून वारंवार घडत राहील. डॉ. प्रमोद वालावलकर यांनी आज सेवाभाव हरवत चाललेल्या डॉक्टरीपेशाला त्यांच्या कार्यकर्तृत्वाने एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. सामाजिक जाणीवेने काम करणाऱ्या डॉ. वालावलकर यांच्याकडे येणाऱ्या रूग्णाला दडपण हे नसायचंच. ‘आपलो हक्काचो माणूस’ अशीच भावना जिल्ह्यातील रूग्णांच्या मनात आहे. अशा सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या डॉ. वालावलकर यांनी प्रसिद्धी मिळावी म्हणून कधीच काही केलं नाही. ते प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहिले. ते करत असलेल्या कार्याची पूर्ण जाणीव समाजमनाला होती. त्यामुळेच सिंधुदुर्गात डॉ.प्रमोद वालावलकर यांच्याबद्दल आदर आणि आपुलकी होती. त्यांच्या कार्याची तुलना पैशांमध्ये मोजता येणार नाही. म्हणूनच डॉक्टरांवर जीवापाड प्रेम करणारी माणसंही गावोगावी सापडतील. डॉ.वालावलकर जे कार्य करत होते त्यात फक्त प्रामाणिकता आणि सेवाभाव ठासून भरलेला होता. त्यांच रहाणीमानही खूपच साधे सरळ होते. त्यांचे वडील प्रभाकर वालावलकर हे समाजवादी विचारणीचे होते. डॉ. वालावलकर यांच्यावरही समाजवादाचा पगडा होता. यामुळेच त्यांचे जसे वागणे, बोलणे होते तसेच त्यांचे रोजचं जगणं होतं. खरंतर स्त्रीरोग तज्ञ असलेल्या डॉ.प्रमोद वालावलकर हे एक हॉस्पिटल उभं करू शकले असते. परंतु पैसा कमावणे हा त्याचा उद्देशच नव्हता. जे मिळतय त्यात रूग्णसेवा करून आनंद घ्यायचा हेच त्यांच जीवनचक्र होत. डॉक्टरांचा सेवाभाव काय असतो आणि रूग्णांना ओरबाडणे कसे असते हे खऱ्याअर्थाने समाजाला कळून आलं ते कोरोना काळातच. काहींनी त्याचा बाजार कसा मांडला याचा अनुभव महाराष्ट्राने घेतला. सिंधुदुर्गनेही घेतला. परिस्थितीचा गैरफायदा उठवल्याची सर्वत्र अनेक उदाहरणे आहेत. सर्वसामान्यांच्या मनात असलेल्या भितीचा बागुलबुवा करीत ओरबाडणं होतं. जेव्हा एखादी व्यक्ती आजारी पडते तेव्हा ती हतबल आणि मजबूर असते. या परिस्थितीत नेहमीच रूग्णाला डॉक्टर हा आधार वाटत असतो. परमेश्वरानंतर रूग्ण आणि नातेवाईकांचा विश्वास आणि श्रद्धा डॉक्टरवर असते. या विश्वासाला कोणी नख लावण्याचा प्रयत्न केला की सहाजिकच माणसांच्या विश्वासार्हतेला आणि माणूसपणाला तडा जातो. डॉ. प्रमोद वालावलकर यांच्या सेवाभावी सेवेने मात्र डॉक्टरी पेशाची मान उंचावावी असंच काम केलं आहे. फुटबॉलप्रेमी असलेल्या डॉ. वालावलकर यांनी ‘ग्लोबल सिंधु फुटबॉल क्लब’ ची स्थापना केली. जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात फुटबॉलपटू निर्माण व्हावेत असाच त्यांचा त्यामागचा हेतू होता. शासकीय रूग्णालयात येणाऱ्या रूग्णाला जर कोणतीही मदत हवी असेल तर ती मदत डॉक्टर वालावलकर स्वत:च्या खिशातून करायचे. आज समाजव्यवस्थेत सर्व क्षेत्रात झालेला बदल माणूसपण हरवत चालल्याचे दिसणारे ठळक चित्र असतानाही डॉक्टर वालावलकर मात्र यातल्या कुठल्याच गोष्टीने कधीच विचलीत झाले नाहीत. या उलट ते रूग्णसेवा अधिक जोमाने आणि प्रामाणिकतेने कारत राहिले. त्यांच्या सेवेचा लाभ गोरगरीबांना होत राहिला. शासकीय रूग्णालयातील सुधारणांसाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते. समाजवादी विचारसरणीच्या असलेल्या डॉ.प्रमोद वालावलकर यांनी त्या विचाराने मार्गक्रमण केले. विविध राजकीय नेते, पुढारी यांच्याशी त्यांचे चांगले नाते राहिले. कधीही पुढे-पुढे न करता त्यांनी त्यांच्या सेवाभावीपणावर लक्ष केंद्रीत केल्याने त्यांच्या चांगल्या कार्याची आठवण नेहमीच येत राहिल. डॉ.प्रमोद वालावलकर यांच्या प्रामाणिक सेवेला त्यांच्यातील माणुसकीला सलाम ! प्रामाणिक आणि सेवाभावी डॉक्टरांच्या यादीत डॉ.वालावलकर यांचे नाव कायमस्वरूपी अधोरेखित झाले.











