लोटे येथे दुचाकीस्वाराच्या धडकेने पादचाऱ्याचा दुर्देवी मृत्यु !

खेड (प्रतिनिधी)तालुक्यातील लोटे एच. पी पेट्रोलपंप ते लोटेमाळ दरम्यान दुचाकीस्वाराच्या धडकेने पाद‌चा-याचा दुर्देवी मृत्यु होण्याची घटना . १२ मे २०२५ रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजताच्या मुदतीत घडली.
 प्रविण पांडुरंग साळवी (वय-४७) असे मृत्यु झालेल्या पाद‌चाऱ्याचे नाव आहे. मयत प्रविण साळवी यांचे भाऊ फिर्यादी रविंद्र पांडुरंग साळवी (वय-३२) यांनी येथील पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार ., पोलिसांनी . १३ मे २०२५ रोजी सकाळी ५:१४ वाजता मोटार सायकलस्वार आरोपी निरज ईश्वरदिन वर्मा (वय २९) याच्याविरोधात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.
                 खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविंद्र पांडुरंग साळवी हे आपल्या इको गाडीमध्ये सीएनजी भरण्यासाठी एच.पी. पेट्रोलपंप लोटे येथे आलेले असताना व ते एच.पी. पेट्रोलपंप लोटे ते लोटेमाळ जाणाऱ्या सर्व्हिस रोडच्या डाव्या बाजूने एच. पी. पेट्रोलपंप लोटे बाजूस जात असताना रात्री १० वाजताच्या सुमारास हिरो कंपनीची ग्लॅमर मोटारसायकल नं. एम. एच. ०८/ए.झेड. / ८७६० वरील स्वार निरज ईश्वरदिन वर्मा याने त्याच्याकडे दुचाकी चालविण्याचे ड्रायव्हिंग लायसन्स नसताना, आपल्या ताब्यातील मोटारसायकल, हयगयीने व भरधाव वेगात चालवून फिर्यादी रविंद्र साळवी यांचे पाद‌चारी भाऊ प्रविण पांडुरंग साळवी यांना पाठीमागून जोरात ठोकरून, अपघात करुन त्यांच्या डोक्याला मागील बाजूस अंतर्गत स्वरुपाच्या, गंभीर स्वरुपाच्या दुखापतीमुळे त्यांच्या नाकातून भरपूर प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यांच्या गंभीर दुखापती व मृत्युस तसेच स्वतः च्या किरकोळ दुखापतीस व मोटारसायकलच्या नुकसानीस कारणीभूत झालेला आहे. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.