लांजा अपघात update: ट्रक चालकाने घेतला दुचाकी स्वाराचा बळी

मुंबई गोवा महामार्गावर देवधे येथील घटना

लांजा (प्रतिनिधी) ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातामध्ये मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज शनिवारी १७ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास देवधे बसस्टॉपनजीक घडला आहे. ट्रक चालकाच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मूळचा रत्नागिरी तालुक्यातील नाचणे सुपलवाडी येथील रहिवासी असलेला रवींद्र रघुनाथ सुपल (वय ५५)असे या अपघातात मृत्यू पावलेल्या मोटरसायकल स्वाराचे नाव आहे. रवींद्र सुपल याचा सेंट्रींग काम करण्याचा व्यवसाय असून तो आपल्या पत्नीसह लांजा कुंभारवाडा येथील दसुरकरचाळ या ठिकाणी राहतो. तर त्यांची दोन्ही मुले ही मुंबईला असतात. रवींद्र सुपल यांची रत्नागिरी नाचणे येथे सेंट्रिंगचे काम चालू असून या ठिकाणी तो दररोज सकाळी रत्नागिरी येथे जाऊन पुन्हा सायंकाळी लांजा येथे येतो.
याप्रमाणे रवींद्र सुपल हा शनिवारी सायंकाळी आपले काम आटोपून आपल्या ताब्यातील मोटरसायकल (क्रमांक एम एच ०८ एस ९७५५) घेऊन नाचणे रत्नागिरी येथून लांजाकडे येत असताना सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास लांजा तालुक्यातील सापुचेतळे येथून चिरे भरून कराडकडे जाणाऱ्या ट्रक (क्रमांक एम एच ०९- इएम ७८९६) यांच्यात अपघात झाला. हा ट्रक विजय आत्माराम काळोखे (वय ४२,राहणार कराड) हा चालवीत होता.सापुचेतळे येथून पालीमार्गे कराडकडे जात असताना देवधे येथील वाळणार रॉंग साईडला ट्रक नेल्याने लांजाच्या दिशेने येणारा मोटरसायकलस्वार रवींद्र सुपल हा ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली आला. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.अशाप्रकारे ट्रक चालकाच्या चुकीमुळेच मोटर सायकलस्वार रवींद्र सुपल यांचा हककनाक बळी गेला आहे.
या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.