रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी शहरानजीक बावनदी येथे पोहण्यासाठी गेलेल्या हातखंबा येथील एका ३५ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज सोमवारी दुपारी घडली. सचिन सुरेश सनगरे (रा. हातखंबा-सनगरेवाडी) असे या मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण हातखंबा परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हातखंबा सनगरेवाडी येथील सचिन सुरेश सनगरे आणि मिलिंद पांडुरंग सनगरे हे दोघे सोमवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास ‘गावात जातो’ असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, गावात न जाता ते थेट बावनदीच्या किनाऱ्यावर पोहोचले. उन्हाचा तडाखा असल्याने त्यांना पोहण्याचा मोह झाला, बावनदी धरणाच्या खालच्या बाजूला आणि पुलाच्या वरील भागात असलेल्या एका खोल डोहात सचिन सनगरे पोहण्यासाठी उतरले. मात्र, त्यांना पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अचूक अंदाज न आल्याने ते बुडू लागले. ही बाब लक्षात येताच किनाऱ्यावर असलेल्या मिलिंद सनगरे याने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्याचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने नदीकडे धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने सचिन सनगरे याला पाण्यातून बाहेर काढून तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा रितसर पंचनामा केला असून, सध्या या घटनेची ‘आकस्मिक मृत्यू’ म्हणून नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे हातखंबा सनगरेवाडी परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे.











