गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे लांजा पोलिसांकडून चौकशी
निओशी ग्रामस्थांकडून संशयित चार व्यक्तींची लांजा पोलिसांना दिली होती नावे
लांजा( प्रतिनिधी) तालुक्यातील निओशी येथील राहुल तांबे या २१ वर्षे तरुणाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी लांजा पोलिसांकडून संशयित चार व्यक्तींची गेल्या दोन दिवसांपासून कसून चौकशी सुरू आहे.
तालुक्यातील निवोशी येथील २१ वर्षीय तरुण राहुल तांबे याचा १८ मे रोजी कोंड्ये गावच्या सीमेवर गटारात संशयास्पद अपघाती मृत्यू आढळून आला होता. या मृत्यूप्रकरणी निओशी ग्रामस्थांच्या वतीने लांजा पोलिसांना निवेदन सादर करून हा अपघात नसून घातपात आहे असे सांगत याबाबत चार संशयित व्यक्तींची नावे देखील पोलिसांना ग्रामस्थांकडून देण्यात आली होती. आणि या चारही व्यक्तींची सखोल चौकशी करून हा अपघात की घातपात आहे हे प्रकरण तडीस लावण्याची विनंती केली होती.
ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार लांजा पोलिसांकडून संबंधित चार संशयित व्यक्तींची गेल्या दोन दिवसांपासून कसून चौकशी करण्यात येत आहे. निओशी ग्रामस्थांच्या मागणीनुसार या प्रकरणात त्या चार संशयित व्यक्तींचा खरोखरच काही सहभाग आहे का या दृष्टीने पोलीस तपास करत असून गेल्या दोन दिवसांपासून पोलीस चारही संशयितां कडून कसून चौकशी करत आहेत. मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती काहीही धागेद्वारे लागलेले नाहीत.