खेडात दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याचे प्रकरण निघाले खोटे

खोटी माहिती देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल !
पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांची माहिती

 खेड (प्रतिनिधी)

तालुक्यात मुंबई – गोवा महामार्गावर रेल्वे स्थानकानजीक खोपीफाटा परिसरात गोळीबार झाल्याची खोटी माहिती ११२ नंबरवरून देणाऱ्या केतन प्रमोद साळवी (रा. मिर्ले , ता.खेड) या तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती येथील खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

पोलीस निरीक्षक श्री.भोयर पुढे म्हणाले की., गोळीबार झालेला नसतानाही केतन साळवी याने ११२ नंबरला कॉल करून गोळीबार झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली,एवढेच नव्हे तर परिसरातील जनतेत घबराट निर्माण झाली. अशी खोटी माहिती देणे हा कायद्याने गुन्हा आहे.

 

तालुक्यात मुंबई – गोवा महामार्गावर रेल्वे स्थानकानजीक खोपीफाटा परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली. दोन अज्ञात तरुणांनी दुचाकीवरून पाठलाग करत एका कारला थांबवले, तिच्यावर प्रथम दगडफेक करून काचा फोडल्या आणि नंतर एका तरुणाने थेट रिव्हॉल्वर बाहेर काढून हवेत गोळीबार केला. ही घटना शनिवारी २४ मे रोजी सायंकाळी घडली असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर खेड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. यानंतर घटनास्थळी एक मोटार काचा फोडलेल्या स्थितीत आढळून आली. मोटारीतील दोन इसम गोळीबार झाल्याचे सांगत कोणी केला यासंदर्भात पोलिसांसह घटनास्थळी उपस्थितांना माहिती देत होते. या घटनेनंतर खेड पोलीस फायरिंग केलेल्या रिवॉल्वरची पुंगळी ( गोळीचा झाडलेला भाग ) घटनास्थळी शोधण्याचे काम करत होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू होती. या घटनेसंदर्भात खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की., अशी कोणती घटना घडलेली नाही. आमचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी जाऊन आलेत, माहिती घेतली असून असा कोणताही प्रकार याठिकाणी घडलेला नाही. दरम्यान खेड पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर, अशी कोणतीच घटना घडली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच अशी खोटी माहिती पोलिसांना देऊन अफवा पसरवून जनतेत घबराट निर्माण करून पोलीस प्रशासनाची धावपळ उडविणाऱ्या केतन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.