भात रोपवाटिकेसाठी चटई पद्धती अवलंबावी

*कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन*

चिपळूण (प्रतिनिधी):– पावसामुळे लागवडी पूर्वीच बहुतांशी भात शेती पाण्याखाली गेली आहे. या स्थितीत शेतकऱ्यांना पेरणी करणे देखील कठीण होऊन बसले आहे. यावर पर्याय म्हणून तालुका कृषी विभागाने भात रोपासाठी चटई पद्धतीची संकल्पना मांडली आहे. या पद्धतीतून १२ ते १५ दिवसात भात रोपे तयार होऊन ती लागवडी योग्य होतात. त्यामुळे या पद्धतीचा अवलंब तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

 

यामध्ये चटई पद्धतीने नवीन भात रोपवाटिका तयार करावी. या पद्धतीत १२ ते १५ दिवसात रोपे लावणीस योग्य होतील. या पद्धतीने तयार केलेली एक गुंठा क्षेत्रातील रोपे एक हेक्‍टर क्षेत्रावरील लागवडीस पुरेशी होतात. रोपवाटिकेसाठी वाफे शेतामध्ये किंवा खळे किंवा शेडमध्ये पक्‍क्‍या जमिनीवरतीसुद्धा करू शकतो.

बहुतांश शेतकरी हे स्वतःकडे उपलब्ध भात बियाणे किंवा  नवीन बियाणे विकत घेऊन धूळवाफ पद्धतीने नियमित मोसमी पाऊस सुरू होण्यापूर्वी रोपवाटिकेची पेरणी करतात. यावर्षी अतिपर्जन्यमान यामुळे धूळवाफा पद्धतीने पेरणी करता आलेली नाही. अशा परिस्थितीत कमी कालावधीत भात रोपवाटिका तयार करावी.सद्यःस्थितीत पाणथळ भागात भात खाचरातील पाण्याची पातळी लक्षात घेता नवीन रोपवाटिका करणे शक्‍य न झाल्यास त्याला पर्याय म्हणून चटई किंवा रहू पद्धतीने भात रोपवाटिका तयार करावी.

 

*चटई रोपवाटिका*

या पद्धतीत १२ ते १५ दिवसात रोपे लावणीस योग्य होतील.

चटई रोपवाटिका शेतकऱ्यांना घराच्या पडवीतही करणे शक्‍य आहे. या पद्धतीने तयार केलेली एक गुंठा क्षेत्रातील रोपे एक हेक्‍टर क्षेत्रावरील लागवडीस पुरेशी होतात.

रोपवाटिकेसाठी वाफे शेतामध्ये किंवा खळे किंवा शेडमध्ये पक्‍क्‍या जमिनीवरतीसुद्धा करू शकतो. रोपवाटिकेसाठी १.२० मी. रुंद व १०० गेजचा प्लॅस्टिकचा कागद वापरतात. एक गुंठा रोपवाटिका तयार करण्यासाठी साधारणपणे २.५ ते ३ किलो कागद लागतो.

पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी प्लॅस्टिकला छिद्रे पाडावीत. सदर प्लॅस्टिक कागद ज्या ठिकाणी आपल्याला रोपवाटिका तयार करावयाची आहे अशा ठिकाणी पसरवून कागदाच्या दोन्ही बाजू विटा किंवा बांबूच्या साहाय्याने उचलून घ्याव्यात. तयार झालेल्या वाफ्यामध्ये माती व शेणखत ६०ः४० या प्रमाणात मिसळावे. हे मिश्रण एक मीटर लांब, अर्धा मीटर रुंद आणि १ इंच उंची असलेल्या लोखंडी फ्रेमच्या मध्ये भरावे. माती व शेणखत मिश्रण फ्रेममध्ये टाकण्यापूर्वी ५ मि.मी.च्या चाळणीमधून चाळून घ्यावी. त्यामुळे मातीमधील खडे वेगळे होतात. प्लॅस्टिक कागदावर शेणखतमिश्रित माती टाकून झाल्यानंतर झारीने पाणी शिंपडून माती ओली करून घ्यावी. हलकासा दाब द्यावा.

अशा वाफ्यावरती रहू पद्धतीने म्हणजेच २४ तास पाण्यात भिजवून नंतर ३६ ते ४८ तास पोत्यामध्ये बियाणे ठेवून मोड आलेले बियाणे ५०० ग्रॅम प्रति चौ. मी. या दराने फेकून पेरावे. या नंतर चाळलेल्या शेणखतमिश्रित मातीने हलकेसे झाकावे.

 

सुरुवातीला २ ते ४ दिवस हाताने किंवा पंपाच्या साहाय्याने पाणी फवारून द्यावे. रोपे थोडी मोठी झाल्यानंतर गरजेनुसार पाणी द्यावे. रोपांच्या जोमदार वाढीसाठी चटई रोपवाटिकेत बी पेरण्यापूर्वी प्रति चौ.मी.साठी २० ग्रॅम डायअमोनियम फॉस्फेट शेणखत, माती मिश्रणात मिसळून द्यावे.

 

रोपे साधारण १२ ते १५ दिवसात लावणीयोग्य होतात. रोपांची संख्या जास्त असल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव होत नाही जर झाल्यास हाताने तणे उपटून घ्यावीत.

 

तयार झालेली रोपे रोपवाटिकेतून प्लॅस्टिक रोल करून किंवा हव्या त्या आकारामध्ये वाफे कापून मुख्य शेतावर जेथे लावणी करावयाची आहे अशा ठिकाणी आपण वाहून नेऊ शकतो.

जर लावणी यंत्राच्या साहाय्याने करावयाची झाल्यास ८ इंच रुंदीच्या रोपवाटिकेच्या पट्ट्या कापून त्या लावणी यंत्रात वापरता येतात.

 

एक चौरस मीटरवर घेतलेल्या रोपवाटिकेतील रोपे एक गुंठा क्षेत्रासाठी पुरेसे होतात, म्हणजेच एक हेक्‍टर क्षेत्रासाठी एक गुंठा क्षेत्र रोपवाटिकेसाठी पुरेसे आहे.

 

*रहू पद्धतीने भात लागवड -*

रहूसाठी ८० ते १०० किलो प्रति हेक्‍टरी बियाणे वापरावे. रहू तयार करताना भात बियाणे गोणपाटात बांधून २४ तास पाण्यात भिजत ठेवावे. त्यानंतर बियाणे पाण्यातून बाहेर काढून २४ तास गोणपाटाच्या खाली-वर सुका पेंढा ठेवून त्यावर पाणी मारावे.

अशा प्रकारे तयार केलेला आणि नुकताच मोड फुटलेला ४८ तासांचा रहू पेरणीसाठी वापरावा.

चिखलणी केलेल्या क्षेत्रावर सुरुवातीची खताची मात्रा दिल्यानंतर रहू शक्‍यतो २२.५ सें.मी. अंतरावर ओळीत पेरावा. ओळीत पेरणे शक्‍य नसेल अशा वेळी रहू फेकून पेरावा, अशी माहिती खेर्डी मंडळ कृषी अधिकारी मनोज गांधी यांनी दिली.