चिपळुणातील स्वामीमठ रस्त्याची अवस्था बिकट

नगर परिषद दीड कोटी खर्च करुन करतेय काम, पावसामुळे अर्धवट राहिलेल्या रस्त्यावर पसरलाय चिखल

चिपळूण (प्रतिनिधी):– गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या व मे महिन्यात कामाचा मुहूर्त सापडलेल्या शहरातील स्वामीमठ ते रामेश्वर मंदिर परिसरातील अर्धवट स्थितीतील रस्त्याची सध्या दयनीय अवस्थ्रा झाली आहे. काही भागात चिखल पसरला असल्याने वाहनचालकांसह नागरिकांचा त्रास आणखीनच वाढला आहे. त्यातच मोऱ्या लहान टाकल्या असल्याने पाणी साचण्याचा धोकाही वाढला आहे. नगर परिषद सुमारे दीड कोटी रुपये खर्च करुन हे काम करीत आहे.

 

काही वर्षांपूर्वी स्वामीमठ ते महाराष्ट्र हायस्कूल हा रस्ता शहरातील मॉडेल रस्ता केला जाईल, अशी घोषणा तत्कालीन लोकप्रतिनिधी व प्रशासनाने केली होती. मात्र प्रत्यक्षात तसे न होता उलट करोडो रुपयांचा महागडा रस्ता बोगस कामांचा नमूना असल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. केलेल्या रस्त्याला समपातळी नसून याच मार्गावरील मोऱ्या खचण्याचा लाजीरवाणा प्रकार दोन वर्षांपूर्वी घडला होता. त्यावर नंतर तात्पुरता मुलामा टाकण्यात आला आहे. तर स्वामीमठ ते रामेश्वर मंदिर हा रस्ता करण्याकडे इतकी वर्षे दुर्लक्ष झाले.

 

त्यामुळे या परिसरातील नागरिक हैराण झाले होते. काही महिन्यांपूर्वी नगर परिषदेने या रस्त्याचे काम हाती घेतले. दीड कोटी रुपये खर्च करुन रुंदीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण व आवश्यक त्या ठिकाणी मोऱ्या असे या कामाचे स्वरुप आहे. त्यामुळे पहिल्या टप्यातील कामे झाली असून त्यानंतर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने हे काम अर्धवट राहिले आहे. त्यामुळे सध्या काही भागात चिखल पसरला असून येथून वाहने चालवणे कठीण बनले आहे. तर ज्या भागात मोऱ्या टाकण्यात आल्या आहेत. त्याही लहान असल्याचे दिसून येत आहे.

 

मुळातच हा रस्ता अनेक कारणांमुळे रखडला होता. त्यातच यावर्षी कामाला सुरुवात झाली असतानाच आता पावसाने कामाला ब्रेक लावला आहे. एवढेच नव्हेतर झालेल्या कामाचीही बिकट अवस्था झाली आहे.

 

त्यामुळे याच कामावर पुन्हा पुढील काम झाले तर त्याचा दर्जा राहिल का ? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत असून प्रशासनाने सर्व बाबींचा विचार करुन पुढील काम करावे अन्यथा मार्कंडी ते बहादूरशेखनाका, गुहागरनाका ते उक्ताड या करोडो रुपयांच्या रस्त्यांप्रमाणे याही रस्त्याची बिकट अवस्था होऊन नगर परिषदेचे करोडो रुपये वाया जातील अशा प्रतिक्रियाही नागरिकांतून उमटू लागेल्या आहेत.