कळंबस्ते रेल्वे फाटक दिवसात ३४ वेळा होतो बंद

 

चिपळूणसह खेड पंधरागावच्या प्रवाशांचा अनेकदा होतो खोळंबा,

चिपळूण (प्रतिनिधी)–: कोकण रेल्वे मार्गावर जिल्ह्यातील एकमेव चिपळूण कळंबस्ते रेल्वे फाटक असून हे फाटक दिवसभरात ३४ फेऱ्यांसाठी बंद ठेवावे लागते. याठिकाणी उड्डाणपुल उभारण्याची मागणी ३२ वर्षे केली जात आहे. त्याप्रमाणे सुमारे २० कोटी ५२ लाखाच्या निधीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मात्र अद्याप निधीची तरतूद होत नसल्याने चिपळूणसह खेड पंधरागावच्या प्रवाशांचा नियमित खोळंबा होत आहे.

तालुक्यातील कळंबस्ते रेल्वे फाटकाला सुरुवातीपासूनच विरोध केला जात आहे. या फाटकामुळे चिपळूण व खेड तालुक्यातील २१ गावं अडचणीत आली आहेत. यामध्ये चिपळूण हद्दीतील कळंबस्ते, नवीन कोळकेवाडी, दळवटणे, खांदाटपाली, निरबाडे, मोरवणे तसेच खेड हद्दीतील आंबडस, चिरणी, भेलसई, केळणे, काडवली, कुंबवली, मुसाड, वावे, कुरवळ खेड, कुरवळ जावळी, धामणंद, कासई, सापेर्ली, तळवट पाली, चोरवणे आदी गावांमधील प्रवाशांचा नियमित खोळंबा होत आहे. दिवसभरात १७ रेल्वे गाड्यांची ये जा होत असल्याने एकूण ३४ फेऱ्या दररोज होतात. या प्रत्येक फेरीसाठी किमान १० ते १५ मिनिटे फाटक बंद ठेवला जातो. याशिवाय हंगामात जादा गाड्या सोडल्या जातात, तेव्हा तर दिवसभरात अनेकदा फाटक बंद केला जातो. या कालावधीत स्थानिक प्रवाशांचे व वाहतुकदारांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात.

या फटकाच्या ठिकाणी उड्डाण पूल होण्यासाठी आतापर्यंत अनेकदा आंदोलन केली गेली. कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती अध्यक्ष शौकत मुकादम व स्थानिक या उड्डाण पुलासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. उत्तर कोकण रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट यांनी आमदार शेखर निकम यांना पाठवलेल्या पत्रात उड्डाण पुलाच्या प्रक्रियेला गती मिळाली असल्याचा उल्लेख केला होता. या उड्डाण पूल निर्मितीसाठी सन २०२१-२२च्या अंदाजपत्रकानुसार सुमारे २० कोटी ५२ लाखाच्या निधीची आवश्यकता आहे. या उड्डाण पूल निर्मितीचे कार्य राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत भूसंपादन प्रक्रियेसह आणि निधीच्या उपलब्धतेनुसार पूर्ण करण्याचे प्रयोजन केले आहे. मात्र उड्डाण पुलाच्या कामाला प्रत्यक्ष कधी सुरुवात होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 

चौकट

वाहतूक कोंडीची डोकेदुखी

कळंबस्ते गाव मुंबई गोवा महामार्गाशी जोडलेला असल्याने पंधरा गाव विभागात ये जा करणाऱ्या वाहनांची संख्या देखील अधिक आहे. मात्र या मार्गावर रेल्वे फाटक असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. बऱ्याचदा वाहनांची लांबच लांब रांगा लागलेल्या असतात.

 

 

चौकट

वर्षानुवर्षे प्रतीक्षा

गेल्या ३२ वर्षात अनेक लोकप्रतिनिधीनी कळंबस्ते रेल्वे फाटकाच्या ठिकाणी उड्डाण पूल उभारण्याची मागणी केली. मात्र इतक्या वर्षांनंतरही या बाबतची सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

 

चौकट

कधी स्कुल बस, तर कधी रुग्णवाहिकेचा खोळंबा

या मार्गावर दिवसातून ३४ वेळा फाटक पडत असल्याने या भागातून चिपळूण मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची स्कुल बस, तर कधी रुग्णवाहिका अडकून पडते. त्याशिवाय विंचू, सर्प दंश झालेले व हृदयविकाराचे रुग्ण या रेल्वे फरकामुळे अडकून पडल्याने संबंधित रुग्णांचा उपचाराअभावी अधिक गंभीर, तर काहींचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

 

कोट

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करू अशी घोषणा केली आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यातील एकमेव असलेल्या कळंबस्ते रेल्वे फाटकाच्या ठिकाणी तातडीने उड्डाण पुलाचे काम हाती घ्यावे. या उड्डाण पुलामुळे स्थानिकांना नियमित त्रास सहन करावा लागत आहे.

शौकत मुकादम, अध्यक्ष कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती, चिपळूण.

 

 

कोट

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कळंबस्ते रेल्वे फाटकाची समस्या गंभीर होत चालली आहे. आता वेळ न घालवता उड्डाण पुलाचे काम हाती घेतले पाहिजे.

शंकर सावर्डेकर, काडवली, खेड