चिपळुणातील आपत्तीग्रस्त ३६६ कुटुंबांवर असणार लक्ष
प्रशासनाकडून दरड व पूरग्रस्तांना नोटिसा
चिपळूण (वार्ताहर) : मागील २० वर्षातील पूर व आपत्कालीन परिस्थितीचा अंदाज घेऊन येथील प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. तालुक्यातील १५ गावांमधील ३६६ कुटुंबांना दरडीचा व पुराचा धोका आहे. संबंधितांना प्रशासनामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या असून आतापासूनच प्रशासन अलर्ट मोडवर आल्याची स्थिती आहे. विशेष म्हणजे गतवर्षी प्रमाणे यावर्षीही कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्थापन समिती स्थापन केल्याने प्रशासनाच्या या भूमिकेचे चिपळूणकरांकडून स्वागत केले जात आहे.
यावर्षी आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार करताना २००५ व २०२१ मध्ये सर्वाधिक उंची गाठलेल्या महापुराचा अंदाज घेण्यात आला आहे. त्यानुसार आपत्कालीन व्यवस्थापनात काही बदल केले आहेत, प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. याच पद्धतीने चिपळूण नगर पालिकेची यंत्रणाही आतापासूनच सतर्क झाली आहे. शहरात पूर बाधित म्हणून १० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे या भागांवर नियुक्त केलेली ७ पथके विशेष लक्ष ठेऊन राहणार आहेत. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास ५ ठिकाणी भोंगे वाजणार आहेत. ८० पोहणाऱ्या तरुणांचीही गरज भासल्यास मदत घेतली जाणार आहे. याशिवाय नगर पालिकेने यांत्रिक फायबर होड्या, ५ बिगर यांत्रिक होड्या, १२० लाईफ जैकेट, ११० बोधे, १७ रक्सी बंडल, १० रबरी खुब १० करक्त, ११ कोयत्या, १२ पाई, १० कटावणी, ११ हातोड्या, १५ चार्जिंग बंटया, ५ मेगाफोन, ७ वॉकी टॉकी, १ सॅटेलाईट फोन आदी साहित्य सज्ज ठेवले आहे. तसेच पुणे येथील अस्तीत्व लाईफ सेव्हिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे नुकतेच नगर पालिकेतील १२० कर्मचाऱ्यांना बचाव कार्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचाही चांगला उपयोग होणार आहे. आपत्कालीन व्यवस्थापन अंतर्गत ग्रामीण भागातही विशेष लक्ष केंद्रित केले आहे. दरडग्रस्त गावांमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यामध्ये पेढे, परशुराम घाट, तिवरे (गावठाणवाडी, फणसवाडी), तिवाडी (उगवत बाडी), पेडांबे (रिंगी धनगरवाडी), येगाव, कामधे खुर्द, कापसाळ, गोवळकोट, मिरजोळी, कळकवणे, आकले, कोळकेवाडी, पोफळी, कळंबट व वीर आदी ठिकाणी दरडीचा धोका आहे. एखाद्या गावात आपत्कालीन घटना घडल्यास तेथील शाळांमध्ये निवारा केंद्र स्थापन केले जाणार आहेत. कोळकेवाडी धरणातील पाणी नियंत्रणासाठी समिती पूर परिस्थितीत कोळकेवाडी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीने तसेच कोळकेवाडी धरण व्यवस्थापन व महाजनकोच्या अधिक्षक अभियंत्यांना पूर परिस्थितीमध्ये जनरेशन कशाप्रकारे करावे, याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आपत्कालीन परिस्थितीत कामकाज पालणार आहे. त्यामुळे चिपळूणच्या दृष्टीने हा निर्णय तितकाच महत्वाचा मानला जात आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. नियंत्रण कक्षात रात्रपाळीही सुरु नगर पालिका कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून येथे नियुक्त कर्मचारी लहान-मोठ्या सर्व घटनांच्या नोंदी ठेवणार आहे. तसेच यापुढे ३० सप्टेंबरपर्यंत येथे रात्रपाळीही राहणार आहे. या मुदतीत दीर्घ रजा व मुख्यालय सोडण्यात येऊ नये असे आदेश मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी सर्व कर्मचाऱ्यांना नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत दिले आहेत. १० ठिकाणी पब्लिक अॅड्रेस सिस्टीम आपत्तीबाबत नागरिकांना वेळीच पूर्व सूचना मिळाव्यात यासाठी शहरातील उक्ताड गणपती मंदिर गोरिवले इमारत, अलिना अपार्टमेंट भेंडीनाका, मनोहर आर्केड बुरुमत्तळी, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, देसाई बिल्डींग काविळतळी, कृष्णाजी कॉम्प्लेक्स चिंचनाका, बाजारपेठ गांधी चौक, कमल कुंज बिल्डींग पेठमाप, गोवळकोट रोड सॉ मिल शेजारी, गोवळकोट रोड कमानीजवळ अशा १० ठिकाणी पब्लिक अॅड्रेस सिस्टीम बसविण्यात आली आहे. शहरात ६ ठिकाणी निवारा केंद्रे पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी पूर क्षेत्राबाहेर ६ ठिकाणी निवारा केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. यामध्ये पाग मराठी शाळा, डीबीजे महाविद्यालय, पाग महिला विद्यालय, ओझरवाडी मराठी शाळा, जिल्हा परिषद इमारत उक्ताड, पाटीदार भवन कापसाळ, रावतळे यांचा समावेश असून यात सुमारे एक हजार ६०० नागरीक राहतील अशी व्यवस्था आहे.








