सावंतवाडीच्या यशराज हॉस्पिटलला आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची मंजुरी

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवेत एक क्रांती घडवणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सावंतवाडी तालुक्यातील स्त्री रोग क्षेत्रात गेली अनेक वर्षे उल्लेखनीय सेवा देणाऱ्या यशराज हॉस्पिटलला आता एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शासकीय मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीमुळे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि मध्यमवर्गीय रुग्णांना आता दर्जेदार आरोग्य सुविधा आणि महागड्या शस्त्रक्रियांचा लाभ योजनेच्या नियमानुसार मोफत उपलब्ध होणार आहे.

यशराज हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेश नवांगुळ आणि त्यांच्या पत्नी मनिषा नवांगुळ यांनी याबाबतची माहिती दिली. डॉ. नवांगुळ यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “या रुग्णालयाला महात्मा फुले योजनेअंतर्गत मंजुरी मिळावी यासाठी आम्ही गेली अनेक वर्षे सातत्याने प्रयत्न करत होतो. अखेर आता ही मंजुरी मिळाल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. या मंजुरीमुळे जिल्ह्यातील अनेक गरजू रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.”

या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना आता दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया (लॅपरोस्कोपिक सर्जरी), पित्ताशयातील खडे काढणे, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, मुतखडा शस्त्रक्रिया, प्रोस्टेट ग्रंथींच्या शस्त्रक्रिया, आणि ठराविक स्त्री रोग शस्त्रक्रियांसह अनेक प्रकारच्या जनरल शस्त्रक्रियांचा लाभ योजनेअंतर्गत घेता येणार आहे. विशेषतः स्त्री रोग क्षेत्रात हॉस्पिटलने दिलेली सेवा पाहता, महिला रुग्णांना याचा सर्वाधिक लाभ होणार आहे, कारण त्यांना आता उच्च दर्जाचे उपचार आणि शस्त्रक्रिया जिल्ह्याबाहेर न जाता स्थानिक पातळीवरच उपलब्ध होतील.

या शासकीय मंजुरीमुळे आता रुग्णांना महागड्या शस्त्रक्रिया आणि उपचारांसाठी शहराबाहेर व जिल्हयाबाहेर जाण्याची गरज भासणार नाही. यशराज हॉस्पिटलमध्येच त्यांना दर्जेदार उपचार आणि शस्त्रक्रिया योजनेच्या नियमानुसार मोफत उपलब्ध होतील. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्रातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांमध्ये विविध आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रियांचा खर्च शासनामार्फत केला जातो.

डॉ. राजेश नवांगुळ यांनी पुढे सांगितले की, “या मंजुरीमुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवेत क्रांती होईल. अनेक रुग्णांना आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहावे लागत होते, पण आता ही अडचण दूर होईल.” या सेवेला सुरुवात करण्यात आली असून, या उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ लवकरच राज्याचे माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर व माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

यशराज हॉस्पिटलच्या या नवीन टप्प्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सुलभ, परवडणारी आणि आधुनिक होणार आहे. रुग्णांना आता अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून होणाऱ्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियांचाही लाभ घेता येणार आहे. या योजनेला मंजुरी मिळण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य केले, त्या सर्वांचे डॉ. नवांगुळ यांनी मनापासून आभार मानले. हा निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे, ज्यामुळे हजारो रुग्णांना आर्थिक भार न सोसता उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध होतील.