मंडणगड l प्रतिनिधी : मंडणगड नगरपंचायत कार्यालय तिसऱ्या मजल्यावर असल्याने शहरातील अपंग, जेष्ठ नागरीकांचे मोठे हाल होत आहेत. नगरपंचायतीचे सुसज्ज कार्यालय नगरपंचायत व्यापारी संकुलाचे तिसऱ्या मजल्यावर सुरु आहे. या मजल्यावर येण्यासाठी संकुलात कोणतीही लिप्ट नाही त्यामुळे शहरातील जेष्ठ नागरीक, अपंग, व्याधीग्रस्त नागरीक, महिला गरोदर माता यांना नगरपंचायत कार्यालयाशी संबंधीत कामाकरिता तिन मजले पाई चढून जावे लागते व काम संपल्यावर खाली उतरावे लागते. संबंधीत काम एकाच खेपेत होईल याची कोणतीही खात्री नसल्याने कामासाठी अनेक फेऱ्या माराव्या लागतात यामुळे नागरीकांची मोठी अडचण होते पण नागरीकांच्या या समस्येकडे लक्ष देण्याकरिता सत्ताधारी प्रशासन यांना वेळ नाही.
नागरीकांना नगरपंचायतीकडून जन्म व मृत्यू दाखले, ओळखीचे दाखले, नगरपंचायत कार्यालयाशी संबंधीत विविध परवाने या करिता वेळोवेळी तिसऱ्या मजल्यावर जावे लागते. बरेचदा एका कामाकरिता तीन ते चार वेळाही कार्यालयास भेट द्यावी लागते. समस्याग्रस्तांची ही अडचण लक्षात घेता व्यापारी संकुलात विजेवर चालणारी लिप्ट बसवणे गरजेचे आहे व ते शक्य नसल्यास दाखले व संबंधीत कामासाठी नगरपंचायतीने व्यापारी संकुलाचे तळमजल्यावर आपला स्वतःचा संपर्क कक्ष सुरु करणे गरजेचे आहे. ज्यामुळे या संपर्क कक्षाचे माध्यमातून सर्व कामे चालतील व नागरीकांना तीन मजले चढावे लागणार नाहीत. नगरपंचायत कार्यालय बहुमजली असल्याने जिल्ह्यातील अनेक नगरपंचायत वा नगरपालिका कार्यालयात तळमजल्यावर अशा प्रकारे संपर्क कक्ष आजही कार्यान्वीत असल्याचे दिसून येते या संदर्भातील तांत्रीक व कायदेशीर बाजू अभ्यासून व गरज भासल्यास अन्य ठिकाणी असलेल्या अशा प्रकारचे कार्यालयांची कार्यपध्दती अभ्यास करुन संबंधीत यंत्रणा मंडणगड मध्ये तातडीने अशा प्रकारे संपर्क कक्ष करुन नागरीकांचे अडचण दुर करावी अशी मागणी समस्याग्रस्तांमधून केली जात आहे.










