टँकर चालकाविरोधात आगार प्रमुखांची पोलीस ठाण्यात तक्रार
मंडणगड : प्रतिनिधी– रा. प. महामंडळाच्या मंडणगड आगारास डीझेल पुरवणाऱ्या टँकरमधून त्याच टँकर चालक व क्लीनर यांनी डीझेल चोरी केल्याचा संशय व्यक्त करत मंडणगड एसटी आगार प्रमुख एम. पी. जुनैदी यांनी या दोन्ही संशयितांविरोधात मंडणगड पोलीस ठाणे येथे 14 ऑगस्ट 2025 रोजी फिर्याद दाखल आहे.
यासंदर्भात पोलीस ठाण्यामधून मिळालेल्या माहितीनुसार, मंडणगड एसटी आगारास एसटी बसेस करिता लागणारा डीझेल साठा पुरवणाऱ्या टँकर 14 ऑगस्ट 2025 रोजी मंडणगड आगारात दाखल झाला. यावेळी आगारातील डीझेल साठा करण्याऱ्या टाकी मध्ये या टँकरमधील डीझेल पूर्णपणे खाली करून घेतले. यानंतर आगारातील सुरक्षा रक्षक यांनी टँकरवर चढून टँकर पूर्णपणे चेक केला असता सदरचा टँकर हा पूर्णपणे रिकामा झालेला आढळला. मात्र सदर टँकर पुन्हा चेक केला असता टँकरच्या कम्पार्टमेंट मध्ये लॉकींग डिव्हाईस जवळ एक स्टील पाईप कॉंक फिरवला होता. त्यामुळे टँकरच्या डीझेल साठ्यामधील काही प्रमाणातील डीझेल दुसऱ्या कम्पार्टमेंट मध्ये येत असल्याचे दिसून आले. याठिकाणी छुपा कप्पा केला असल्याचेही निदर्शनात आले.
यावरून टँकरच्या झाकणाचे बाजूला छेडछाड करून चालक व क्लीनर डिझेलची चोरी करत आहेत याची खात्री झाली म्हणून फिर्याद दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यासंदर्भात संशयित टँकर चालक मोहन देवकाते व क्लीनर यांच्यावर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












