महाराष्ट्रात साकारणार देशातील पहिला ‘जलपर्यटन प्रकल्प’: निवती येथे उद्या मुहूर्तमेढ सोहळा

सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पुढाकाराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती येथे भारतातील पहिल्या जलपर्यटन प्रकल्पाची मुहूर्तमेढ उद्या, १० जून रोजी रोवली जाणार आहे. हा ऐतिहासिक सोहळा मुंबई मंत्रालयातून दुपारी १२ वाजता ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दिली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला जागतिक पर्यटन नकाशावर स्थान मिळणार असून, पर्यटकांना समुद्राखालील जीवनाचा अनुभव घेता येणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळून रोजगाराच्या संधीही निर्माण होतील अशी अपेक्षा आहे.

या मुहूर्तमेढ सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पालकमंत्री नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुख्य उपस्थिती राहणार आहे. तसेच, आमदार निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

याप्रसंगी अतुल पाटणे (प्रधान सचिव, पर्यटन), डॉ. बी.एन. पाटील (भा.प्र.से., संचालक, पर्यटन संचालनालय), डॉ. माणिक दिवे (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सिंधुदुर्ग), मनोजकुमार सुर्यवंशी (भा.प्र.से., व्यवस्थापकीय संचालक), अनिल पाटील (भा.प्र.से., जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग) आणि मोहन दहिकर (भा.पो.से., जिल्हा पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग) या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही उपस्थिती असणार आहे.

संजय ढेकणे, क्षिप्रा बोरा आणि दीपक माने या अधिकाऱ्यांनी सर्वांना या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. निवती येथील हा जलपर्यटन प्रकल्प महाराष्ट्राच्या पर्यटन विकासात मैलाचा दगड ठरणार असून, पर्यटकांना एक अनोखा आणि अविस्मरणीय अनुभव देईल अशी आशा आहे.