रत्नागिरी ः प्रतिनिधी :मुलभूत पोलिस प्रशिक्षण पूर्ण करुन रत्नागिरी जिल्हा पोलिस दलामध्ये मंगळवार 10 जून रोजी 112 नवीन पोलिस शिपाई हजर झाले. या सर्वांना पोलिस अधिक्षक नितीन बगाटे तसेच अपर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी गुलाब पुष्प देउन शुभेच्छा दिल्या.
या मधील 66 पुरुष नव प्रविष्ट पोलिस शिपाई यांना लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथे, 45 महिला नव प्रविष्ट पोलिस शिपाई यांना सांगली जिल्ह्यातील तुरची येथे तर 1 नव प्रविष्ट पोलिस शिपाईने नाणविज,दौंड येथे मुलभूत पोलिस प्रशिक्षणासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिस दलामार्फत पाठवण्यात आले होते. या सर्वांना पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांनी आपल्या कर्तव्याप्रति समर्पण आणि शिस्त राखणे, सोशल मिडीयावर योग्य वर्तन राखणे, योग्य व स्मार्ट पोलिसिंग करणे आणि सर्व प्रकारची कर्तव्ये पार पाडण्याबाबत व अपग्रेड होण्याबाबत अवगत केले. तसेच वेळोवेळी स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून यश प्राप्त करण्याबाबत मार्गदर्शनही केले. तसेच महिला नव प्रविष्ट पोलिस कोमल सावंत हिचे “सर्वोत्तम कमांडो कोर्स प्रशिक्षणार्थी” म्हणून ट्रॉफी संपादन केल्याबद्दल विशेष अभिनंदन केले.
यावेळी अपर पोलिस अधिक्षक,जयश्री गायकवाड यांनी देखील सर्व 112 नव प्रविष्ट पोलिस शिपाई यांना रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाचे नाव आपल्या कर्तुत्वातून उंचावण्याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाकरता पोलिस उपअधिक्षक (मुख्यालय) राधिका फडके, राखीव पोलिस निरीक्षक, पोलिस मुख्यालय राजेंद्र कुळसंगे, पोलिस अधिकारी,मंत्रालयीन कर्मचारी, पोलिस कवायत प्रशिक्षक पोलिस हवालदार सावंत,सार्दळ व अंमलदार उपस्थित होते.










